MaharashtraRainUpdate : सावधान रात्र धोक्याची आहे !! राज्यातील “या ” जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा…

पुणे : उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पुढील २ ते ३ तासात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागावर्तविला आहे. दरम्यान हा अंदाज लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. या माहितीनुसार, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये, तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये, आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि नाशिकमझ्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट
दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रतितास इतका असणार आहे. या पूर्वी हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, नाशिक, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तर उद्या मंगळवार, २८ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, रायगड, धुळे आणि जळगावला रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईसह रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार आणि औरंगाबादसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता.
जळगाव जिल्ह्यात वीज पडून महिलेसह बालिकेचा मृत्यू
जळगाव जिल्ह्यात आज सोमवारी वीज पडून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका महिलेसह १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला या पैकी जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील विवरा खुर्द परिसरात दुपारी चारला पावसाला सुरुवात झाली तेंव्हा माजी सरपंच राजेंद्र पाटील यांच्या शेतात राहणारी नूरकी वाघेला (वय३५) ही महिला शेजारच्याच विहिरीवर गेली असता तिच्या अंगावर वीज कोसळून ती जागीच ठार झाली तर शेजारीच असलेल्या झोपडीत तिची भाची रोशनी (वय९), मुलगा राहुल (वय७) आणि मुलगी रवीना (वय३) आणि याच शेतात दुसऱ्या बाजूला काम करणारा तिचा पती मात्र बचावले आहेत.
दरम्यान याच जिल्ह्याच्या विटनेर शिवारात शेतात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीच्या अंगावर वीज कोसळल्याने आज सायंकाळी जागीच मृत्यू झाला असल्याचेही वृत्त आहे. सोनाली राजेंद्र बारेला (वय-१३) रा. विटनेर ता. जि.जळगाव असे मयत मुलीचे नाव आहे. विटनेर शिवारातील शेतात सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेतात असतांना तिच्या अंगावर कोसळून तीचा जागीच मृत्यू झाला. जळगाव येथील एस.यु.पाटील यांच्या शेतात राहणारा रविंद्र भिमसिंग बारेला यांच्याकडे साधारण एक ते दीड महिन्यापासून सोनाली राजेंद्र बारेला राहत होती. त्याच्या मृत्यूने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.