MaharashtraPoliticalUpdate : शरद पवार यांच्या “त्या ” विधानावरून राजकीय वादंग

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केलेल्या “आजच्या काँग्रेसची अवस्था ही जमीनदारासारखी झाली आहे. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार कोणा एके काळी हे शिवार सगळ हिरवेगार होते, असे सांगतो. तशीच काहीशी अवस्था काँग्रेसची झाली आहे . या वक्तव्यावरून राजकीय गदारोळ उठला आहे. दरम्यान त्यांच्या या विधानाचे राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पवारांना हे कोणते राजकारण आहे ? असा प्रश्न विचारला आहे.
‘इंडिया टुडे’चे मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या ‘मुंबई तक’च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पवारांची राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी काँग्रेसवर केलेल्या टिप्पणीची आता चर्चा सुरु झाली आहे.
यावेळी बोलताना पवार म्हणाले कि , काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्याबाबत एक उदाहरण पवारांनी सांगितले. उत्तर प्रदेशतील जमिनदारांकडे मोठी शेती आणि हवेलीही असायची. कमाल जमीन धारणा कायदा झाला आणि त्यांच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमीन आता १५-२० एकरावर आली. जमीनदार उठतो बाहेर जाऊन बघतो. त्याला पीक दिसते. तेव्हा तो हे सर्व हिरव पीक माझे होते, असे सांगतो. पण सध्या ते त्याचे नसते. तशी अवस्था काँग्रेसची झाली आहे, असे निरीक्षण पवारांनी नोंदविले.
दरम्यान राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे पवारांना राष्ट्रपती करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत, अशी चर्चा सुरू आहे. याबद्दलच पवार म्हणाले, मला प्रशांत किशोरची मदत घेण्याची गरज नाही. सध्या मला सत्तेत बसण्याचीही कुठली महत्त्वाकांक्षा नाही. पण विरोधी पक्षांमध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे पवारांनी स्पष्ट के ले.