Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AhmadnagarNewsUpdate : खून प्रकरणातील कोरोनाबाधित आरोपी रुग्णलयातून पसार

Spread the love

अहमदनगर : राहुरी येथील पत्रकार तथा माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे (वय ४६, रा. वांबोरी, ता. राहुरी) याने जिल्हा रुग्णालयातून पलायन केले असल्याचे वृत्त आहे. मोरे याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र शनिवारी सायंकाळी लघुशंकेचे निमित्त करून पोलिसांची नजर चुकवत तो पळून गेल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी कान्हू मोरे याला अटक केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी आरोपी मोरे रुग्णालयातून पळून गेला. त्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून त्याचा शोध सुरू आहे. तो खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी तर आहेच शिवाय कोरोनाचा रुग्णही असल्याचे चिंता अधिक वाढली आहे. आरोपी मोरे हा पाच फूट उंचीचा असून, अंगात पिवळा शर्ट घातला आहे. मजबूत शरीर यष्टी आणि दाढी वाढलेली आहे. कोणाला आढळून आल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राहुरीतील पत्रकार दातीर यांचा ६ एप्रिल २०२१ रोजी खून झाला होता. प्रथम त्यांचे अपहरण केले आणि नंतर खून करून मृतदेह शहरात आणून टाकण्यात आला होता. सुरुवातीला या प्रकरणात पोलीस चालढकल करत असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर याचा तपास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यांनी काही दिवसांतच आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला अटक केली होती. नेवासा फाटा येथील एका हॉटेलमध्ये तो लपून बसला होता. त्याचे अन्य साथीदारही पकडले गेले. आरोपी मोरे याला न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यानच्या काळात या गुन्ह्याचे दोषारोपपत्रही न्यायालयात दाखल झाले असून आरोपी मोरे याने जमिनीच्या कारणावरून दातीर यांचा खून घडवून केल्याचे तपासाच निष्पन्न झाले आहे.

दरम्यान न्यायालयीन कोठडीत असताना गेल्या आठवड्यात मोरे याला कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्याला राहुरी येथून नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यास सांगण्यात आले होते मात्र शनिवारी सायंकाळी त्याने लघुशंकेचा बहाणा केला आणि पोलिसांची नजर चुकवून तो पळून गेल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!