MarathawadaNewsUpdate : डॉ. भागवत कराड यांच्या जनाशीर्वाद यात्रेला परळीतून प्रारंभ, पण का संतापल्या पंकजा मुंडे ?

बीड : मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून स्थान मिळालेल्या डॉ. भावात कराड यांनी पक्षाच्या आदेशानुसार आपल्या जनाशीर्वाद यात्रेला परळीतून सुरुवात केली आहे.दरम्यान यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेतली आणि त्यांच्या उपस्थितीतच कराड यांची यात्रा सुरू झाली. मात्र यावेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी ‘मुंडे साहेब अमर रहे… पंकजाताई अंगार है, बाकी सब भंगार है…’ अशा घोषणा देताच पंकजा मुंडे यांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना जाहीररित्या झापले.
मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांच्याऐवजी डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागल्याने मुंडे कुटुंबीयांवर पक्षाने अन्याय केल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. हि नाराजी व्यक्त करण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याच्या घोषणाही केल्या होत्या. परंतु पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना समजावले होते. तरीही केंद्रीय राज्यमंत्री जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने परळीत येताच कार्यकर्त्यांची नाराजी उफाळून आल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी आज कराड यांनी पंकजा यांची भेट घेतली. तेव्हा याच नाराजीची प्रचिती आली. पंकजा मुंडे यांच्या घराबाहेर कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत होते. ‘मुंडे साहेब अमर रहे… पंकजाताई अंगार है, बाकी सब भंगार है…’ अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.
कराड यांच्या भेटीनंतर त्यांच्या यात्रेला शुभेच्छा देण्यासाठीही पंकजा उपस्थित होत्या. मात्र, तेव्हाही कार्यकर्त्यांच्या घोषणा सुरूच होत्या. त्यातील ‘अंगार… भंगार’ या घोषणेमुळं पंकजा मुंडे संतापल्या. अशा घोषणा देणाऱ्यां कार्यकर्त्यांना हे सर्व थांबवा असे सुनावले.