Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज ठाकरे यांना संभाजी ब्रिगेडने का घेतले शिंगावर ?

Spread the love

पुणे : मनसे नेते राज ठाकरे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज ठाकरेंना जसे बाबासाहेब पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, अशा शब्दात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी पोस्ट करत राज ठाकरे यांना सुनावले आहे. तर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी राज ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांचे वारसदार आहेत की, पुरंदरे यांचे ते जाहीर करावे असे आव्हान दिले आहे.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढीस लागल्याचं वक्तव्य केले होते . विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर हा संघर्ष वाढू लागला, असा थेट आरोपही राज ठाकरे यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससह संभाजी ब्रिगेडनेही त्यांची खिल्ली उडवली आहे.

राजकारणात अपयशी ठरलेला माणूस

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये प्रवीण गायकवाड यांनी म्हटले आहे कि , राज ठाकरेंना जसे बाबासाहेब पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

ब्राह्मणी वर्चस्वाला जवळ करणारी मांडणी

हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघर्षाचा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा राज ठाकरे यांना विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले, अससेही गायकवाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. गायकवाड पुढे म्हणतात, राज ठाकरे यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की.

आपण कुणाचे वारसदार हे राज यांनी जाहीर करावे

राज ठाकरे ज्या पद्धतीने महाराष्ट्राला शिवरायांचा चुकीचा इतिहास सांगतात त्या पुरंदरे यांची बाजू घेतात त्यावरून त्यांचा वारसा प्रबोधनकार ठाकरे यांचा आहे कि, पुरंदरेंच्या हे जाहीर करावे असे आव्हान दिले आहे. राज ठाकरे यांनी पुरंदरेवर टीका करणारे संभाजी ब्रिगेडचे प्रणेते पुरूषोत्तम खेडेकर यांच्यावर टीका केली होती त्यावरून हा वाद निर्माण झाला आहे. त्यावरून राज ठाकरे प्रबोधनकार ठाकरे यांचे वारसदार आहेत की, पुरंदरे यांचे ? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी केला आहे.

काय बोलले राज ठाकरे ?

पुरंदरे यांनी जेम्स लेन या इतिहासकाराला चुकीची माहिती देऊन जिजाऊंची बदनामी केल्याच्या टीकेवर बोलताना राज ठाकरे यांनी पुरंदरे यांची बाजू घेत “कोण आहे हा जेम्स लेन? त्याने पुस्तक लिहिलं. तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता का? तो आता कोण आहे? कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणातून हे सगळं डिझाईन झालं आहे. त्यातून शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीचा सांगितला गेला, ते करणारे अमुक जातीचे लोक आहेत वगैरे बोललं गेलं”  असे बोलताना त्यांनी खेडेकर यांच्यावर कोण खेडेकर ? असे उद्गार काढल्याने वाद निर्माण झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!