ParliamentNewsUpdate : संसदेच्या दोन्हीही सभागृहात “गोंधळ चालू काम बंद” चा खेळ !!

कृषी कायदे, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेले मृत्यू आणि पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांचा हंगामा
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असली तरी संसद आणि राज्यसभेतील कामकाजापेक्षा दोन्हीही सभागृह अधिक काळ तहकूब करण्यातच वेळ चालला आहे. बुधवारच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा एकदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सदनाच्या कामकाजाला सुरूवात झाली. मात्र, सकाळी ११.०० वाजता कामकाज सुरू होताच कृषी कायदे, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेले मृत्यू तसंच पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांनी जोरदार गोंधळ घातल्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज अवघ्या काही मिनिटांतच गुंडाळावे लागले.
पहिल्यांदा १२.०० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलेलं कामकाज सुरू होताना गोंधळाच्या वातावरणात पुन्हा एकदा दुपारी २.०० वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं. काँग्रेसचे लोकसभा खासदार मनिष तिवारी यांनी पेगॅसस हेरगिरीच्या मुद्यावरून सदनात स्थगन प्रस्ताव नोटीस दिली. या दरम्यान काँग्रेस खासदारांनी तीन कृषी कायद्यांविरोधात संसद परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोअर ग्रुप बैठक घेतली. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा, कृषी मंत्री नरेंद्र तोमर, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी तसंच पीयूष गोयल हेदेखील उपस्थित होते. संसदेतील रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली.
शेतकऱ्यांकडून ‘किसान संसद’
दुसरीकडे, कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटना जंतर मंतर मैदानात दाखल झाल्या आहेत. इथे आज शेतकऱ्यांकडून ‘किसान संसद’ भरवली गेलीय. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी २०० शेतकऱ्यांना दिल्ली पोलिसांकडून परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान संसदेतील पावसाळी अधिवेशनात गुरुवारी पेगॅसस प्रकरणावरून जोरदार गोंधळ झाला. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव हेरगिरी प्रकरणावरून राज्यसभेत बाजू मांडण्यास उभे राहिले. तेव्हा विरोधी पक्षातील खासदारांनी त्यांना बोलू दिलं नाही. वैष्णव सरकारची बाजू मांडत असताना तृणमूल काँग्रेसचे खासदार पुढे सरसावले आणि त्यांनी मंत्र्यांच्या् हातून पेपर खेचून घेतले आणि फाडून टाकला. त्यामुळे राज्यसभेत एकच गोंधळ उडाला. गोंधळामुळे मंत्री अश्विनी वैष्णव यांना बोलताही आलं नाही. गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.