MaharashtraRainUpdate : कोकण , मुंबईत पावसाचा हाहाकार , मराठवाड्यातही पुढील ३६ तासात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.तर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची भीती आहे तर दुसरीकडे चिपळूणमध्ये महापुराची भीती व्यक्त होत आहे. याशिवाय रायगड, ठाणे येथेही पावसाने धुमाकूळ घातला आहे.
दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा, विदर्भ आणि मराठवड्यासाठी पुढील ३६ तास महत्वाचे असून पुढील २ ते ३ दिवस हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने २२ ते २६ जुलै पर्यंत गंभीर हवामानाचा इशारा दिला आहे. चिपळूण शहरात पावसाचा जोर कायम असल्याने दुपारीही पूरपरिस्थिती कायम आहे. पाण्याची पातळी वाढत आहे. मुसळधार पावसामुळे शहरात दोन बळी गेल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान कोविड केंद्रातील २१ रुग्णांचा जीवही धोक्यात आला आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद
लांजा तालुक्यात आंजणारी पुलाखालून पाणी वाहत असल्याने वाहतूकीसाठी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. काजरघाटीच्या रस्त्यावर पाणी असल्याने वाहतूकीसाठी रस्ता बंद विलवडे वाकड पूल पाण्याखाली असल्याने वाहतूक बंद पाचल येथील तळवडे पाणी शिरल्याने अंशतः नुकसान जीवीत हानी नाही.
मुंबईलाही पावसाने झोडपले
सलग पाचव्या दिवशीही मुंबईलाही पावसाने झोडपलं असून जुलै महिन्यातील मुंबईच्या पावसाची सरासरी ८४० मिमी असताना यंदा मात्र १ जुलै ते २१ जुलै या कालावधीत सांताक्रूझ येथे १०३२.२ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.