Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraRainUpdate : कोकणात पूरग्रस्त परिस्थिती , मुख्यमंत्र्यांचे बचाव कार्याचे आदेश, पंतप्रधानांकडून चौकशी

Spread the love

मुंबई: अतिवृष्टीमुळे गेल्या २४ तासांत विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा सांगितला असून रेड व ऑरेंज अलर्ट दिला आहे.


मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव लाभक्षेत्र अजय कोहिरकर, विजय गौतम, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभाग जलसंपदा मुख्य अभियंता तिरमणवार उपस्थित होते.

सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी, अशा सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. एनडीआरएफ तुकड्या, स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत अशी माहिती यावेळी यावेळी मुख्य सचिवांनी दिली. बैठकीत नद्यांच्या वाढलेल्या पाणीपातळीबाबत माहिती देण्यात आली.

पंतप्रधानांकडून मुख्यमंत्र्यांना फोन

दरम्यान महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह इतर जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून कोकण रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांना पूराच्या पाण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला असल्याचे वृत्त आहे. पंतप्रधान मोदींनी मराठीतून ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण फोनवर चर्चा केली. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत राज्य सरकारला सर्वतोपरी मदत केंद्राकडून दिली जाईल. सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतो, असे  पंतप्रधान मोदींनी ट्वीटमधून म्हटले आहे.

कोकणात पूरग्रस्त परिस्थिती

महाराष्ट्रात कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. रत्नागिरी जिल्ह्यांत नद्यांना पूर आला आहे. संपूर्ण चिपळून शहत पुराच्या पाण्याने वेढले गेले आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. बहुतेक नद्या पूररेषेच्या जवळून वाहत आहेत. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांतील नद्यांनाही पूर आला आहे. हवामान विभागाने ४ ते ५ दिवसांचा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!