CoronaIndiaUpdate : धक्कादायक : जगातील ४६टक्के रुग्ण एकट्या भारतातले !!

नवी दिल्ली : देशभरात दररोज कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडाही वाढत असल्याचे चित्र आहे. अशात आता जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले , की संपूर्ण जगभरातील एकूण कोरोना रुग्णसंख्येतील 46 टक्के रुग्ण हे एकट्या भारतातील आहेत. मागील आठवड्यात या महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांपैकी 25 टक्के रुग्ण भारतातील होते.
केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णसंख्येने एका दिवसातील आकडेवारीने 4 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. देशात गुरुवारी चोवीस तासात कोरोनाचे 4.14 लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर, 3,927 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागील दहा दिवसात कोरोनामुळे 36,110 जणांनी जीव गमावला आहे.
दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत मागील दहा दिवसात कोरोनाने 34,798 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, ब्राझीलमध्ये 32,692 रुग्णांचा, मेक्सिको आणि ब्रिटेनमध्ये 13,897 आणि 13,266 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. गुरुवारी चोवीस तासात कोरोनाचे 4,14,554 तर बुधवारी 4,12,784 नवे रुग्ण आढळले आहेत.
या वृत्तानुसार भारतात 13 असे राज्य आहेत जिथे मागील चोवीस तासात 100 हून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तमिळनाडू, हरियाणा, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, झारखंड, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे मागील चोवीस तासात १०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने यातील सर्वात छोटं राज्य असलेल्या उत्तराखंडमध्ये 151 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राची स्थिती अजूनही बिकट आहे. राज्यात गुरुवारी 853 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटकमध्येही हा आकडा ३०० च्या पुढे आहे.