AurangabadNewsUpdate : ‘महानायक’च्या हाती सीसीटीव्ही फुटेज , “त्या ” सलून चालकाचा मृत्यू नेमका कसा झाला ?

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात १४ एप्रिलच्या दिवशी लॉक डाऊन च्या नियमाचे पालन करीत असताना , उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सलून चालकाचे दुकान उघडे असल्यामुळे, एक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी बंद करण्यासाठी गेलेला होता . या कारवाई दरम्यान सलून चालकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी मयत फेरोजखानचा पोलिसांनी मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप संबंधित पोलिसांवर ठेवल्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मात्र महानायक ऑनलाईनच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार फेरोज खान स्वतःच चक्कर येऊन त्याच्या शेजारच्या बंद दुकानाच्या शटरवर कोसळल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे ज्या पोलिसांवर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे , ते पोलीस त्याच्या बरेच बाजूला अंतराने उभे असल्याचे दिसत आहे.
महानायक ऑनलाईनच्या हाती आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळावर फेरोजच्या मालकीच्या सलूनच्या दुकानासमोर फेरोज आणि त्याची चौकशी करणाऱ्या पोलिसांच्या मध्ये एक दुसरी व्यक्ती उभी असून त्याच्यात चर्चा चालू आहे. हि चर्चा चालू असतानाच फेरोज खान स्वतः चक्कर येऊन पडल्याचे दिसत आहे. फेरोज खाली कोसळल्याचे लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित लोक चक्कर येऊन पडलेल्या फेरोजखानकडे त्याला उचलण्यासाठी धावले त्यावेळी पोलिसही तेथे उभा आहे. दरम्यान लोकांकडून त्याला उपचारासाठी नेले जात असताना पोलीस घटनास्थळावरून निघून गेले.
पोलिसांवर कारवाईची मागणी
या घटनेनंतर पोलिसांनी मारहाण केल्यामुळेच फेरोज खानचा मृत्यू झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले . सोशल मीडियावरूनही या अफवा व्हायरल झाल्या आणि उस्मानपुरा पोलिसांच्या विरोधात मोठ्या संख्येने जमाव उस्मानपुरा ठाण्याच्या समोर जमा झाला. परिणामी प्रचंड तणाव निर्माण झाला. आणि या घटनेला जबाबदार धरून संतप्त नातेवाईकांनी फेरोजखानचा मृतदेह उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या आवारात आणून संबंधित पोलिसांना फेरोजखान याच्या मृत्यूला कारणीभूत ठरवीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत कारवाईची मागणी केली. त्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली.
अविनाश आघाव यांच्याकडे चौकशी
दरम्यान खा . इम्तियाज जलील , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कादिर मौलाना यांनी तत्काळ उस्मानपुरा पोलीस ठाण्याला भेट देऊन नातेवाईकांची बाजू समजून घेतली त्याचवेळी पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी खा . इम्तियाज जलील , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कादिर मौलाना यांच्याशी आणि मयत फेरोज यांच्या नातेवाईकांशी चर्चा करून आश्वासित केले कि , ज्या दोन पोलिसांमुळे हे घडले असे आपले म्हणणे आहे त्या पोलिसांची तत्काळ नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे चौकशी देण्यात येत आहे. इनकॅमेरा पोस्टमार्टेम व्हावे यासाठी घाटीच्या अधिष्ठाता यांना विनंती करण्यात येईल. त्यानंतर मयत फेरोज खान यांच्या नातेवाईकांनी मृतदेह पोस्टमार्टेमसाठी नेण्यास परवानगी दिली आणि तणाव संपला.
निखिल गुप्ता यांची कामगिरी…
यावेळी उस्मानपुरा पोलीस ठाण्यासमोर मोठा जमाव जमला होता . या जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, रामेश्वर रोडगे, सुरेंद्र माळाळे, संतोष पाटील व सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी उस्मानपुरा पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता परंतु पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी अतिशय संयमाने परिस्थितीवर ताबा मिळवत पोलीस फोर्सला आणि अंग रक्षकांना बाजूला होण्याचे आदेश देऊन स्वतः जमावामध्ये जाऊन जमावाला शांत केले.