AurangabadCoronaUpdate : धक्कादायक : औरंगाबादेत एकेका बेडवर तीन-तीन रुग्ण , तसेच लावले जात आहे ऑक्सिजन !!

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात दररोज ५०० ते १००० रुग्ण वाढत असल्याने शासकीय रुग्णालय प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे . नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेने बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या केवळ अर्धी असल्याने नवीन रुग्णांना बेड चा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असल्याने एका बेडवर तीन -तीन रुग्णांना ठेवले जात आहे तर अनेक रुग्णांना फरशीवरच राहावे लागत आहे. विशेष म्हणजे नाकाला ऑक्सिजन लावून या रुग्णांवर बसून उपचार केले जात आहेत. परिणामी जिल्हा प्रशासनाची यंत्रणा पूर्णतः कोलमडली असून नागरिकांनी आता तरी कोरोनाच्या नियमांचे पालन करून सावध होण्याची वेळ आली आहे.
एकीकडे कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे अजूनही संपर्क साखळी तोडण्यासाठी नियोजन केलेले दिसत नाही. गतवर्षी रुग्णसंख्या वाढत असतांना महापालिकेने चोख नियोजन केले होते. रुग्णाच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची चाचणी करुन कोरोनाची साखळी तोडण्यात पालिका प्रशासनास यश आले होते. मात्र यावर्षी पुन्हा एकदा परिस्थिती बिघडत असतांना संपर्क साखळीचा शोध घेतला जात नसल्याचे समोर आले आहे. तसेच तपासणी अहवाल मध्ये देखील त्रुटी होत आहे, काही रूग्णाला उशिरा सांगितले जाते आहे, प्रशासनाच्या ‘याच’ चुकीमुळे शहरात कोरोना वाढत आहे.
कोरोनाचे रुग्णसंख्या कमी होती त्यावेळी कोरोनाचा रुग्ण आढळून येताच त्याच्या घरी जाऊन संपर्कात आलेल्या नातेवाईकांची तपासणी केली जात होती. परंतु आता संपर्क साखळीचा शोध घेतला जात नाही. त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांची तपासणी देखील केली जात नाही. त्यात काहीजण स्वतःहून तपासणी करतात. तर काहीजण उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जावे लागेल या भीतीने तपासणी करत नाहीत. त्यामुळे ही संपर्क साखळीचा तुटणार कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे औरंगाबाद जिल्ह्यात प्रतिदिन हजारांहून अधिक रुग्ण समोर येत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे अजूनही कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कुठल्याही प्रकारची तपासणी होत नसल्याने संसर्ग वाढतच आहे.
गतवर्षी तात्काळ तपासणी केली जात होती. याशिवाय कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह येताच त्यांच्या घरी आरोग्य विभागाचे पथक जाऊन त्यांचे स्वॅब घेत होते. इतकेच नव्हे तर क्वारन्टाईनचा शिक्का हातावर मारला जात होता. सध्या. मात्र याबाबतीत प्रशासन उदासीन दिसून येत असून नागरिक देखील बेफिकरीने वागत असल्याचे समोर आले आहे.
आता केवळ रुग्ण आढळून आला तर त्यांना उपचारासाठी दाखल होण्याचे सांगितले जाते. परंतु त्यांच्या घरातील नातेवाईकांची तपासणी करण्यासाठी पथक फिरकतही नाही. त्यामुळे संपर्क साखळी तोडायची कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर काही रूग्ण हे पाँजीटिव्ह असताना देखील रिपोर्ट उशिरा येत असल्याने फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे.
संशयित रुग्णांचा स्वॅब घेतल्यानंतर, त्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही? हे कळण्यासाठी किमान २४ तास लागतात. तोपर्यंत संबंधित रुग्णांची हेळसांड होते. शहरातील कोणत्याच रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. त्यामुळे कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णाला गरज असेल तरच रुग्णालयात दाखल करावं. अन्यथा रुग्णावर घरी राहून उपचार द्यावेत. गरज नसताना रुग्णालयातील बेड आडवून धरू नयेत, अशाप्रकारची चाचपणी मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी करायला सुरुवात केली आहे.
प्रशासनाचे असे चालू आहेत प्रयत्न
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला आदेश देण्यात आले आहे. यानंतर शहरी भागात सीसीसी, डिसीएच आणि डीसीएचसी या उपचार सुविधांमध्ये एकूण ६०१४ बेड उपलब्ध करण्यात आले आहेत. तर ग्रामीण भागात सीसीसीमध्ये १२४४ तर डीसीएचसीमध्ये २२५ बेड्स उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचबरोबर नागरिकांना उपलब्ध बेड संदर्भात माहिती मिळवण्यासाठी शहरी भागात डॉ. बासीत अली खान- 9326789007 तसेच पीयुष राठोड- 8830061846, 8855876654 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच ग्रामीण भागातील बेडसंदर्भात माहिती मिळवण्यासाठी डॉ. कुडीलकर – 9420703008 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.