मुख्यमंत्र्यांनी केले हॉटेल्स, उपाहारगृहांना सहकार्य करण्याचे आवाहन

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. परिस्थिती अशीच कायम राहिली तर, राज्यातही काही अंशी सार्वत्रिक लॉकडाऊन नाकारता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल्स, उपाहारगृहे, मॉल्स संघटनांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन पुन्हा एकदा आवाहन केले आहे.
शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रतिनिधींशी बैठक घेऊन आवाहन केले. की, कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी सहकार्य करावे. लॉकडाऊन करून सगळे बंद करणे आम्हालाही नको आहे. पण, मास्क न घालणे, सुरक्षित अंतर न ठेवणे अशा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असून आम्हाला कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोनाची रुग्णसंख्या काहीशी नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसू लागल्यानंतर लगेचच राज्य शासनाने अनेक निर्बंधांमध्ये शिथिलता आणली. ज्याअंतर्गत मॉल, हॉटेल्स आणि उपहारगृह सुरु करण्याचीही मुभा देण्यात आली. पण, नागरिकांनी मात्र या ठिकाणांवर भेट देत कोरोना नियमांचे उलंघन केल्याचे पाहायला मिळाले. याच हलगर्जीपणाच्या निकालस्वरुपी कोरोनाचे सावट पुन्हा वाढले.