सेंन्ट्रल बँकेच्या व्यवस्थापकांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला ; बँक खातेदारांच्या रक्कमेचा केला होता अपहार

औरंंगाबाद : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या उस्मानपुरा येथील शाखेतील सहाय्यक व्यवस्थापक दिपक शास्त्री आणि विशेष सहाय्यक अविनाश तेरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
बँकेतील खातेदाराच्या खात्यातील रक्कम स्वत:च्या व स्वत:च्या नातेवाईकांच्या खात्यावर वळती केल्याचा गुन्हा उपरोक्त दोघांसह एकुण ६ जणांविरुध्द क्रांती चौक पोलीस ठाण्यात दाखल आहे. बँकेचे खातेदार चरणकुमार मुरलीधर गवळी यांनी बँकेला दिलेला सुरक्षा धनादेश वटवून त्यांच्या खात्यातून अडिच लाख रुपये परस्पर काढून घेण्यात आले होते. बँकेने अंतर्गत चौकशी केली असता ही रक्कम स्वत:च्या व नातेवाईकांच्या खात्यावर जमा केल्याचे आढळून आले होते. त्यानंतर बँकेचे विभागीय व्यवस्थापक विनोदकुमार बाळकृष्ण यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीआधारे दीपक शास्त्री, श्रीकांत कुलकर्णी, अविनाश तेरकर, जाई पाठक, माधुरी भाले, पायल गोपनारायण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.