अल्पवयीन मुलीच्या ओठाचा लचका तोडणारा तीन महिन्यानंतर गजाआड एमआयडीसी वाळूज पोलिसांची कारवाई

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्या ओठाचा लचका तोडणाऱ्यास पोलिसांनी तीन महिन्यानंतर गजाआड केले. भारत राजू गडवे (वय २२, रा.वडगाव कोल्हाटी) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्याचे नाव असून तो रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांनी सोमवारी (दि.२५) दिली.
तीन महिन्यापुर्वी १६ ऑक्टोबर २०२० रोजी वडगाव कोल्हाटी परिसरात राहणाऱ्या ७ वर्षीय मुलीचे अपहरण करून जवळच सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणावर नेत एकाने तिच्या ओठाचा लचका तोडला होता. या घटनेमुळे एमआयडीसी वाळूज परिसरात एकच खळबळ उडाली होती. पीडित मुलीच्या काकाने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, दोन ते तीन दिवसापूर्वी एमआयडीसी वाळूज परिसरात एका मजूराच्या खून प्रकरणात पोलिसांनी भारत गडवे याला ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान गडवे याने तीन महिन्यापूर्वी अल्पवयीन मुलीच्या ओठाचा लचका तोडला असल्याची कबूली दिली.
छावणी विभागाचे सहाय्यक आयुक्त विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे, उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव, सतीश पंडीत, सहाय्यक फौजदार खय्युम पठाण, प्रकाश गायकवाड, नवाब शेख, सुधीर सोनवणे, विनोद परदेशी, मनमोहन कोलमी, दिपक मतलबे, रेवननाथ गवळे, बंडू गोरे, विक्रम वाघ, धनेधर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.