MaharashtraNewsUpdate : भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने भोंदूबाबाने पीडित तरुणीच्या आई, आजी आणि मामीवरही केला अत्याचार !!

नागपूर शहरात एका भोंदूबाबाने भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शारीरिक संबंध न केल्यास तुझ्या आई-वडिलांचा मृत्यू होईल, अशी भीती दाखवत नराधम भोंदूबाबने १७ वर्षीय मुलीवर दोन महिने लैंगिक अत्याचार केला. धक्कादायक म्हणजे नराधमानं पीडित मुलीच्या कुटुंबातील तीन महिलांवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. नागपुराच्या पारडी परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे. पारडी पोलिसांनी आरोपी भोंदूबाबाला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि , आरोपी भोंदूबाबनं भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीच्या आई, आजी आणि मामीवरही अत्याचार केला. या प्रकरणी पारडी पोलिसांनी नराधम भोंदूबाबाला अटक केली आहे. धमेंद्र निनावे उर्फ दुलेवाले असे या नराधमाचे नाव आहे. भोंदूबाबने भूतबाधा उतरविण्याच्या बहाण्याने १७ वर्षीय मुलीसह तिच्या कुटुंबातील तीन महिला नातेवाईकांवर लैंगिक अत्याचार केला. भोंदूबाबा पीडित तरुणीच्या वडिलांचा मित्र आहे. दोन वर्षांपासून पीडित तरुणीच्या कुटुंबीयांच्या तो संपर्कात होता.
काही महिन्यांपूर्वी हा भोंदूबाबा पीडित तरुणीच्या घरी आला आणि ‘तुमच्या घरात भूतबाधा झाली आहे. मोठे संकट येणार आहे. वेळीच पूजा न केल्यास भूत अनेकांचा बळी घेईल, अशी भीती त्याने दाखवली होती. त्यासाठी तुम्हाला पूजा करावी लागेल, असे सांगत मुलीवर भूताचा अधिक प्रभाव असल्याचे सांगत भूत उतरविण्याच्या बहाण्याने तो पीडित मुलीला घरी घेवून गेला आणि दोन महिने तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे तर पीडितेची आई, मामी आणि आजीवरही या भामट्यानं अत्याचार केला. पूजेच्या बहाण्याने या भोंदूबाबाने पीडित मुलीसह आई, मामी आणि आजीवरही चंद्रपूर, डोंगरगड येथे भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्याने कुकर्म केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांनी दिली आहे.