#AurangabadUpdate : जिल्ह्यात कोरोना लसींचे वितरण सुरु

केंद्र सरकार कडून प्राप्त लसींचे जिल्ह्यातील वेगवेगळ्या लसीकरण केंद्रांसाठी गुरुवार (दि.१४) रोजी वाटप सुरु करण्यात आले.
केंद्र सरकारकडून जिल्हा प्रशासनाला लसींची पहिली खेप प्राप्त झाली. त्यानंतर आता ग्रामीण भागांसाठी या लसींचे वाटप सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी कोव्हीड १९ चे एकूण १४ हजार डोसेस प्राप्त झाले असून, १८ जानेवारी पासून सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथून लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. यासाठी गुरुवार, १४ रोजी पालोद प्राथमिक आरोग्य केंद्र, फुलंब्री ग्रामीण रुग्णालय, सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रत्येकी एकूण ११० लसींचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी यावेळी दिली. गुरुवारी जिल्हा परिषद आरोग्य सभापती अविनाश गलांडे पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून व्हॅक्सिनेशन व्हॅन (लस वाहन) रवाना करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके, सहायक जिल्हा अधिकारी डॉ. गोपाळ कुडलीकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रकाश ब्रम्हकर, मुख्य औषध निर्माण अधिकारी उषा ढवणे, आरोग्य सहायक भागीनाथ थोरात, स्वीय सहायक कृष्णा बोरसे, वाहन चालक हिरालाल शेजवळ यांची उपस्थिती होती.