AurangabadNewsUpdate : रिक्षाचालकाचे मोबाईल लंपास करणाऱ्यासह विकत घेणारही गजाआड

जिन्सी पोलिसांची कारवाई, चोरीचे ३ मोबाईल जप्त
औरंंगाबाद : रिक्षा चालकाचे मोबाईल लंपास करणार्या सराईत चोराला जिन्सी पोलिसांनी शरीफ कॉलनीतून गजाआड केले. तर त्याच्याकडून चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्या मोबाईल शॉपी चालकाला देखील अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि.१३) दुपारी करण्यात आली असल्याची माहिती जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी कळविली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख उस्मान शेख मोहमंद (वय ३०, रा. शरीफ कॉलनी गल्ली क्र. ९) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोबाईल चोराचे नाव आहे. तर सय्यद मज्जीत सय्यद नजरअली (वय ३०, रा. किराडपुरा गल्ली क्र.३) असे चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्याचे नाव आहे. रिक्षाचालकाचे मोबाईल लंपास करून विक्री करणारा कुख्यात शेख उस्मान शेख मोहमंद हा जिन्सी परिसरात आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बुधवारी दुपारी जिन्सी पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहायक फौजदार हेमंत सुपेकर, संपत राठोड, हारुण शेख, किशोर बुंदीले, संजय गावंडे, नंदलाल चव्हाण, संतोष बमनात आदींनी सापळा रचून शेख उस्मान याला ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान, शेख उस्मान याने रिक्षाचालकांचे लंपास केलेले मोबाईल कटकट गेट परिसरातील ह्यात मोबाईल शॉपीचे सय्यद मजीत सय्यद नजरअली यांना विक्री केले असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी सय्यद मजीत सय्यद नजरअली यांना देखील ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून ५० हजार रूपये किंमतीचे चोरीचे तीन मोबाईल हस्तगत केले आहेत. दोन्ही आरोपींकडून शहरातील मोबाईल चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. शेख उस्मान हा सराईत मोबाईल चोर असून रिक्षाचालक आणि वृद्धांचे मोबाईल काही वेळ बोलण्यासाठी घेवुन ते चोरून नेण्यात पटाईत असल्याचे पोलिसांनी सांगितले.