MaharashtraNewsUpdate : पुण्यात एल्गार परिषदेच्या आयोजनाची तयारी

पुण्यात येत्या ३१ डिसेंबरला एल्गार परिषद भरवण्याची परवानगी पोलिसांकडे मागण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी त्यासाठी पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनकडे परवानगी मिळावी यासाठी अर्ज केला आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच याठिकाणी या एल्गार परिषडेचे आयोजन करण्यात येत असल्याचे कोळसेपाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान स्वारगेट पोलिसांनी पर्वांगीसाठीचा अर्ज वरिष्ठांकडे पाठवला आहे.
दोन वर्षांपूर्वी शनिवार वाड्यावर झालेली एल्गार परिषद वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या परिषदेशी संबंधित काही विचारवंत आणि दिग्गजांवर कारवाई करण्यात आली असून या प्रकरणाचा तपस NIA करीत आहे. या प्रकरणी काही विचारवंत सध्या तुरुंगात आहेत. भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हि परिषद आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर१ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे १ जानेवारी रोजी देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे. मात्र कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर एक आढावा बैठक घेण्यात आली होती. या आढावा बैठकीला विविध संघटनांचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ, सर्व विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.