AurangabadNewsUpdate : भरधाव एसटी बसने दुचाकीस्वार तरूणांना चिरडले , एक जण जागीच ठार , एकाची प्रकृती गंभीर

औरंंंगाबाद : जालन्याकडे भरधाव वेगाने जाणा-या एसटी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या तरूणांना जोराची धडक दिली. हा भीषण अपघात मंगळवारी (दि.२२) दुपारी बारा वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानक चौकात घडला. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण जागीच ठार झाला. तर दुचाकीस्वार शुभम अंकुश शिंदे (१९, मुळ रा. वडसावित्रीनगर, परळी वैजनाथ, ह. मु. एन-५, सिडको) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी बसचालक सुखदेव दत्तात्रेय चाटे ला अटक करण्यात आली आहे.जखमी युवक गंभीर असल्यामुळे अपघातात ठार झालेल्याचे नाव समजू शकले नव्हते.
सिडको बसस्थानकाजवळील चौकात दोन दुचाकीस्वार सिग्नल सुटण्याची वाट पाहत होते. यावेळी एसटीच्या (एमएच-१३- सीयू-७३१२) पाठीमागे शुभम शिंदे हा दुचाकी (एमएच-४४-व्ही-४४१२) स्वार मित्रासोबत उभा होता. त्याचवेळी सिडको बसस्थानकातून प्रवासी घेऊन जालन्याकडे भरधाव जाणा-या बस (एमएच-२०-बीएल-२९०६) चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे समोर उभ्या असलेल्या एसटीवर आदळून हे दुचाकीस्वार पुन्हा मागील बसच्या डाव्या चाकाखाली येऊन अडकले. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला शुभमचा मित्र जागीच ठार झाला. तर शुभम गंभीर जखमी झाला. अपघात घडताच अक्षरश: दोघांच्या रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या होत्या. अपघातानंतर नागरिकांनी दोन्ही जखमींना ओढून बाहेर काढले. या अपघातामुळे चौकातील वाहतूक सुमारे अर्धा तास खोळंबली होती. बसचे कुलंट फुटून रस्त्यावर दोघांच्या रक्तासह वाहत होते.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक मीरा लाड यांनी कर्मचा-यांसह धाव घेतली. तसेच उपायुक्त दीपक गि-हे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी अपघातग्रस्त एसटीचा चालक पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बसमधील दहा प्रवासी जखमी
अपघातात एसटीतील दहा प्रवासी जखमी झाले. वैशाली सुनील खुंटे (वय ४०, रा. हडको), शोभा मोहन टेटवार (वय ५०, रा. संघर्षनगर), ज्योतीराम बाळु चव्हाण (वय ३२, रा. तपोवन तांडा, जालना), किशोर लक्ष्मण लाचुरे (वय ४०, रा. केदारखेडा, जालना), कांचन सांडू गारदे (वय ६६), सांडू आसाराम गारदे (वय ६८, दोघेही रा. रोहिदासनगर, पैठण), श्वेता सूरज चोंडीये (वय १८), नेहा सुनील बसैय्ये (वय २०), सुनीता सुनील बसैय्ये (वय ५२, तिघीही रा. नवा मोंढा) आणि सुनील मधुकर जायभाये (वय २७, रा. नायगाव, बुलढाणा) अशी जखमींची नावे आहेत. यापैकी तिघांना गंभीर मार आहे. या जखमींना उपचारासाठी साडेपाच हजारांची मदत एसटीने दिली आहे.
रुग्णवाहिका पोहोचलीच नाही
हा अपघात एवढा भीषण होता की, आवाजाने आजूबाजूचे सर्व जण भयभीत झाले. अपघाताच्या काही क्षणातच काय झाले म्हणून पाहण्यासाठी जवळील हॉटेल चालक एकनाथ गोपाळ यांनी धाव घेतली. तेव्हा दुचाकी बसच्या डाव्या बाजूच्या चाकामध्ये शिरल्याचे पाहून गोपाळ यांनी अन्य काही नागरिकांच्या मदतीने जखमी शुभम आणि त्याच्या मित्राला बसच्या चाकामधून बाहेर काढले. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र, बराच वेळ होऊनही रुग्णवाहिका येत नसल्याचे पाहून अखेर त्यांना रिक्षाने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.