MaharashtraNewsUpdate : …..म्हणून बंद होतेय ” सावित्री -ज्योती ” मालिका , वाचा महेश टिळेकर , हरी नरके यांच्या भावना

सोनी टीव्हीवर सुरु असलेली सावित्री-जोती : आभाळाएवढी माणसं होती ही मालिका फुले शाहू आंबेडकरांच्या म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने मालिका बंद करावी लागत असल्याच्या पोस्ट या मालिकेचे निर्माते महेश टिळेकर आणि प्रसिद्ध विचारवंत आणि व्याख्याते प्रा . हरी नरके यांनी टाकल्यामुळे मोठी सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरु झाली आहे. यावरून या दोघांनीही आपली परखड मते मांडली आहेत. यावेळी सोनी मराठी या चॅनेल वरील मालिकेवरुन टिळेकर प्रेक्षकांना चांगलेच धारेवर धरले आहे. महात्मा जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत ‘सावित्री ज्योती’ ही मालिका केवळ मालिकेला टीआरपी नाही म्हणून बंद होत आहे. शनि. २६ डिसेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.
https://www.facebook.com/maheshtilekarofficial/photos/a.1882815868440573/3525381147517362/
याबाबत महेश टिळेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे कि , टिळेकर म्हणाले की, ‘फक्त टीआरपीमुळे जेव्हा चांगलं कथानक असलेली मालिका बंद होते तेव्हा फार वाईट वाटतं. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका वठवणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण या सगळ्यात चांगलं कथानक असूनही आपल्या महापुरुषांच्या जीवनावर, कार्यावर आधारित मालिका पाहायला प्रेक्षकांना उत्साह का नसावा?’
जबाबदार कोण ?
‘नवऱ्याची लफडी, सासू सूनांची भांडणं, येता जाता एकमेकींवर कुरघोडी करणाऱ्या जावा, हे असं सगळं बटबटीत पाहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का ? असा प्रश्न आता उभा राहिला आहे. विनोदाच्या नावावर माकडचाळे करून नक्की विनोद कशाला म्हणायचं असा प्रश्न पडतो. पण पाहणारे हसत आहेत यातच आपल्या अभिनयाचं श्रेय आहे असं मानणारे आणि कामाच्या मिळालेल्या पैशांत सुख मानणारे कलाकार आहेत. बऱ्याचदा परिस्थितीमुळे अनेकांना हे करणं भाग पडतं पण काही रिअॅलिटी शोमध्ये विनोदाचा दर्जा आणि मर्यादा राखून लोकांचं मनोरंजन करणारे विनोदी कलाकारही आहेत.’
उत्तम अभिनय करूनही त्यांची मालिका फक्त प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होत असेल तर या कलाकारांना किती दुःख होत असेल, की जीव तोडून मेहनत घेऊन टीआरपीच्या धंदेवाईक स्पर्धेत त्यांची मालिका यशस्वी झाली नाही. सावित्री ज्योती सारख्या उत्तम मालिका प्रेक्षकांच्या पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होते याला जबाबदार काळानुसार बदलत चाललेली प्रेक्षकांची आवड की आणखी कुणी? असा प्रश्नही टिळेकर यांनी उपस्थित केला आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=4875161925889813&id=100001881615760
प्रा. हरी नरके यांनी व्यक्त केले दुःख
या विषयावरून लिहिलेल्या आपल्या फेसबुक पोस्टमध्ये प्रा . हरी नरके यांनी म्हटले कि , या मालिकेला सर्व स्तरातील जाणत्यांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि सुजाण प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ती मध्येच बंद होतेय याचे मनस्वी दु:ख आहे. खरं तर आत्ताशी कुठे मुख्य गोष्टीला सुरूवात झाली होती. मालिका पकडही घेऊ लागली होती. एरवी कोणतीही मालिका न बघणारे काही जाणते लोक ही मालिका आवर्जून बघतात. एक नवा प्रेक्षकवर्ग मालिकांकडे, सोनी मराठीकडे वळू लागलेला होता. काहीलोक वेळ जुळत नसल्याने अॅपवर ही मालिका बघत होते. पण त्यांची मोजणी टीआरपीमध्ये होत नाही. माणसाला निखळ करमणुकीची गरज असते असे मी मानतो. त्याच्या जोडीला ज्ञान, संस्कृती, वर्तमान, जगाचे व जगण्याचे भान वाढवणार्या, रंजनातून सामाजिक प्रबोधन, लोकशिक्षण करणार्या सावित्रीजोतीसारख्या मालिकाही आवश्यक आहेत. त्या मुल्यभानाची रसद आणि जगण्याचा पैस विस्तारणारी उर्जा पुरवित असतात.
हा तर समाजद्रोह वाटतो…
सदैव इतिहासात रमलेल्या मराठी माणसांचा १९-२० व्या शतकातील समाजसुधारणा, शिक्षण आणि परिवर्तन विचार मनोरंजनतून समजून घेण्यातला रस आटलाय का? कुठलीही कलाकृती ही त्या काळाचं अपत्य असते. प्रस्तुत काळ हा जोती-सावित्रीच्या विचारांना, प्रेरणांना, त्यागाला वा ध्येयवादाला फारसा पोषक नाही. ज्यांच्यासाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग त्या दोघांनी केला त्या स्त्रिया आणि बहुजन समाज हेच टिव्हीच्या सर्व मालिकांचे मुख्य प्रेक्षक आहेत. तेच स्वत:च्या इतिहासाबद्दल, पुर्वजांच्या त्यागाबद्दल, वारशाबदल बेपर्वा आणि बेफिकीर आहेत? बहुजन समाजाला शतकांच्या गुलामीतून बाहेर काढणारे सावित्रीजोतीसारखे लोक बहुजनांनाच आपलेसे न वाटणे हे मला समाजद्रोहासारखे वाटते. हा आप्पलपोटेपणा, करंटेपणा मला फार बोचतो.
दर्जेदार कंटेण्ट लोकांना हवाच असतो यावर माझा ठाम विश्वास आहे. या मालिकेने सोनी मराठीला एक व्यापक सामाजिक पाया मिळवून दिला. सोनी मराठीचा रिच बहुजनांमध्ये वाढवला. सावित्री-जोतीची कथा सशक्त आहे. दणकट लेखन, कलाकारांचा उत्तम अभिनय, कसदार सादरीकरण, कसबी दिग्दर्शन आणि दशमी क्रिएशनची सर्वोत्कृष्ठ निर्मिती यामुळे ही मालिका अव्वल दर्जाची बनलेली आहे. ही मालिका ज्यांनी बघितली ते तिला अनेक वर्षे विसरणार नाहीत.
आत्मपरीक्षण आम्ही नक्कीच करू
उंच माझा झोका ही उत्तम मालिका चालते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३५ नंतर आवरती घ्यावी लागते आणि सावित्री जोती तर मध्येच गुंडाळावी लागते. अशाने या जॉनरच्या मालिका करण्याचे धाडस कोण करील? म्हातारी मेल्याचेही दु:ख आहेच, पण काळ बेदरकारपणे सोकावतोय याचे जास्त दु:ख आहे. काहीजण आम्हाला म्हणाले, “टीआरपी नसला तरी मालिका चालू ठेवा.” कोणतीही मालिका तयार करायला पैसा लागतो, तो ज्या वाहिनीकडून दिला जातो तिला जाहीरातींद्वारे तो परत मिळत असतो. जाहीराती मिळणे न मिळणे हे सर्वस्वी टीआरपीवरच अवलंबून असते. प्रेक्षकांपासून म्हणजेच टिआरपीपासून फटकून राहून मालिका चालू शकत नाहीत ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे. सावित्री जोती मालिकेला टिआरपी होता, पण तेव्हढा पुरेसा नव्हता. या मालिकेमागचे आमचे, दशमी व सोनी मराठीचे प्रयत्न प्रामाणिक होते. उत्तम टिम आणि ऑनेस्ट स्पिरिट असूनही प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात खेचून आणण्यात आणि टाईमस्पेंड वाढवण्यात आम्ही कुठे कमी पडलो याचे आत्मपरीक्षण आम्ही नक्कीच करू.