IndiaCrimeUpdate : शेजारच्या मुलाने मुलगी पळवली म्हणून… व्यंकटेश – करिष्माच्या ” अनाडी ” सिनेमास्टाईल , मुलीच्या घरच्यांनी मुलाच्या आईचे लावून दिले जबरदस्ती लग्न !!

बिहारच्या दरभंगामधील एका गावात ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेत मुलगा शेजारच्या घरात राहणाऱ्या मुलीसोबत पळून गेल्यामुळे त्याची भयानक शिक्षा मुलाच्या आईला देण्यात आली. यामध्ये काही वर्षांपूर्वी आलेल्या व्यंकटेश आणि करिष्मा कपूरच्या ” अनाडी ” हिंदी सिनेमात दाखवल्याप्रमाणे संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या आईचे एका अपंग माणसासोबत जबरदस्तीने लग्न लावून दिले.
दरम्यान पळून गेलेल्या जोडप्याने त्यांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या आईच्या कपाळावर जबरदस्तीने कुंकू लावले व एका अपंग व्यक्तीच्या गळयात हार घालायला लावला. त्यांनी या महिलेचे मुंडणही केले. महिलेच्या मुलाने आपल्या घरातील मुलीला पळवून नेले, म्हणून बदला घेण्याच्या हेतूने त्यांनी हे सर्व केले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. १४ नोव्हेंबरला ही घटना घडली. त्याचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. घरातून पळून गेलेल्या या जोडप्याला अजूनही पोलिसांना शोधता आलेले नाही. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जबरदस्तीने लग्न लावण्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरुन काढून टाकण्यासाठी सायबर सेलला सांगण्यात आले आहे.
याविषयी पोलीस अधिकारी दिलीप कुमार झा यांनी सांगितले कि , “१४ नोव्हेंबरला ही घटना घडली. महिलेचे केस कापण्यात आले व तिला लग्नाचे विधी करण्यास भाग पाडण्यात आले. महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात मुलीच्या १५ नातेवाईकांविरोधात तक्रार नोंदवली. दोन्ही कुटुंब शेजारी राहतात” असे सांगितले. दोन्ही कुटुंबांच्या घराजवळ आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अशीच घटना १९९३ मध्ये आलेल्या के मुरली मोहन राव यांनी दिग्दर्शित केलेल्या ” अनाडी ” या हिंदी बॉलिवूड सिनेमध्ये दाखवण्यात आली होती. यातील एका दृश्यात चित्रपटाचा नायक रामा (व्यंकटेश) जेंव्हा चित्रपटाची नायिका नंदिनी ( करिष्मा कपूर ) हिला घेऊन पळून जातो तेंव्हा रामाची विधवा आई सावित्री ( राखी ) ला नंदीनीचा मोठा भाऊ ( सुरेश ओबेरॉय ) मारहाण करून तिचे गावातील वेड्यासोबत लग्न लावून देण्याचा प्रयत्न करतो. अशीच हि घटना असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.