AnvayNaikSuicideCase : दिलासा नाहीच , अर्णब गोस्वामीची दररोज तीन तास चौकशी करण्यास अलिबाग सत्र न्यायालयाची परवानगी

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेला रिपब्लिकन टीव्हीचा मुख्य संपादक अर्णब गोस्वामी याच्या चौकशीला अलिबाग सत्र न्यायालयाने आज हिरवा कंदील दाखवला. गोस्वामी यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आलं असून, तिथेच दररोज तीन तास चौकशी करण्याची परवानगी न्यायालयाने पोलिसांना दिली. दरम्यान हाय कोर्टाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर अर्णबच्या वकिलांनी अलिबागच्या सत्र न्यायालयात जामिनासाठी दिलेल्या अर्जावर मात्र काल न्यायालयाने कुठलाही निर्णय दिला नाही.
गेल्या बुधवारी रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामला अन्वय नाईक प्रकरणात अटक केली होती. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या चौकशीसाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यावर न्यायालयाने पोलिसांच्या मागणीनंतर दररोज तीन तास चौकशी करण्याची परवानगी रायगड पोलिसांना दिली. दरम्यान, काल दुपारी मुंबई उच्च न्यायालयाने अर्णबचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळून लावला. त्याचबरोबर कनिष्ठ न्यायालयात जाण्याचे आदेश गोस्वामी यांना दिले त्यानुसार ते अलिबाग न्यायालयात गेले मात्र न्यायालयाने त्यावर कुठलाही निर्णय दिला नाही.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची राज्यपालांवर नाराजी
गंभीर गुन्ह्याखाली अटक झालेल्या आरोपीला सहानुभूती दाखवण्याऐवजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अन्वय नाईक यांच्या कुटुंबाला सहानुभूती दाखवली असती तर बरं झालं असतं, असं सांगतानाच राज्यपालांनी एका आरोपीची बाजू घेणे योग्य नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या अर्णब गोस्वामी यांना सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे नमूद करत नवाब मलिक यांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
‘कारागृहात असलेल्या प्रत्येक कैद्याच्या आरोग्याची आणी जीवाची जबाबदारी निश्चितपणे सरकारचीच असते. यात कोणतेही दुमत नाही. शिवाय कारागृहाच्या नियमांनुसार कैद्याच्या नातेवाईकांना त्याला भेटण्यास परवानगीही दिली जातेच. ही नियमित प्रक्रिया आहे. पण, ज्या पद्धतीने राज्यपाल कोश्यारी हे अर्णब गोस्वामी यांना विशेष कैदी म्हणून सहानुभूती दाखवत आहेत ती बाब खटकणारी आहे. मला वाटतं एका गंभीर गुन्ह्यात अर्णब यांना अटक झाली आहे आणि त्यामुळे राज्यपालांना जर कुणाला सहानुभूती दाखवायचीच असेल तर त्यांनी ती अन्वय नाईक यांच्या कुटुंबीयांबाबत दाखवायला हवी होती. हे कुटुंब गेले बरेच महिने न्यायासाठी भटकत होते. त्यामुळे त्यांची बाजू न घेता एका आरोपीची बाजू घेतली जाते हे योग्य नाही’, अशा शब्दांत मलिक यांनी आपली नाराजी व्यक्त केली.