AnvayNaikSuicideCase : अर्णब गोस्वामीची तळोजा मध्यवर्ती कारागृहात रवानगी

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरि न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णब गोस्वामीची रवानगी नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. त्याला अटक केल्यानंतर अलिबागमधील एका शाळेत उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते.
गेल्या बुधवारी अर्णब गोस्वामीला अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रायगड पोलीस आणि मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्याला अलिबाग येथे एका शाळेत उभारलेल्या तात्पुरत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. शविवारी उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली होती. मात्र, त्याच्या जामीनाबाबत तातडीने कोणताही आदेश दिला जाऊ शकत नाही असे स्पष्ट करीत याबाबतचा आदेश राखून ठेवत असल्याचे खंडपीठाने सांगितले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळी त्याला नवी मुंबईतील तळोजा कारागृहात हलवण्यात आले आहे.
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावर सोमवारी दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने शनिवारी रात्री उशिरा त्यांच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केलेल्या नोटिशीनुसार, न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपिठा समोरच विशेष व्हीसी सुनावणी होणार आहे.