AnvayNikeSuicideCase : अर्णब गोस्वामीच्या जामीन अर्जावर अद्याप निकाल नाही , तुरुंगातील मुक्काम कायम !! कोर्टात आज काय झाले ?

वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आज मुंबई हायकोर्टाकडून कुठलाही दिलासा मिळू शकला नाही. आता तक्रारदार आणि राज्य सरकारचे उत्तर आल्यानंतरच उद्या अर्णब यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी होणार आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामीचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. कालची रात्र अर्णबला शाळेत बनविलेल्या तात्युरत्या तुरुंगात काढावी लागली असल्याचे वृत्त आहे.
अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलीस व रायगड पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत बुधवारी अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना अलिबाग कोर्टात हजर करण्यात आले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या कोठडीला आव्हान देत अर्णब यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर आज सुनावणी झाली परंतु अर्णब यांना आज तरी कुठलाही दिलासा मिळू शकला नाही.
न्यायालयातील युक्तिवाद
आज न्यायालयात युक्तिवाद करताना अर्णब गोस्वामीचे वकील म्हणाले कि , ‘अलिबाग दंडाधिकारी न्यायालयाने १६ एप्रिल २०१९ रोजीच पोलिसांचा ए-समरी अहवाल स्वीकारून हे प्रकरण बंद केलं होतं. त्याला पीडित नाईक कुटुंबानं आव्हान दिलं नाही आणि तो अहवाल आजही तसाच आहे. पोलिसांनीही पुन्हा तपास सुरू करण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेतली नसून स्वत:हूनच फेरतपास सुरू केला आहे. कायद्यानुसार याला परवानगीच नाही. त्यामुळे गोस्वामी यांचे गजाआड राहणे पूर्णत: बेकायदा आहे’. मात्र, फिर्यादी आणि पोलिसांचे म्हणणे ऐकल्याविना आदेश करू शकत नाही, असं स्पष्ट करत न्यायालयाने जामिनावरील सुटकेविषयी उद्या, शुक्रवारी दुपारी ३ वाजता सुनावणी ठेवली असल्याचे वृत्त आहे.
अर्णब गोस्वामी यांची अटक प्रत्येक सेकंदासाठी बेकायदा
अर्णब गोस्वामी यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी. गोस्वामींच्या तात्काळ जामिनासाठी सुद्धा अॅड. आबाद पोंडा यांच्यामार्फत अर्ज करण्यात आला आहे. दोन दिवसांनी दिवाळीच्या सुटीमुळे उच्च न्यायालय कदाचित आमच्यासाठी उपलब्ध नसेल. त्यामुळे हायकोर्टाने आपल्या विशेषाधिकारात याचा विचार करावा आणि या प्रकरणात नागरिकाच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे हायकोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करून अंतरिम दिलासा द्यावा, अशी पोंडा यांनी न्यालयालायाला विनंती केली . आम्ही दंडाधिकारी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला तर दंडाधिकारी कोर्टाने योग्य वेळी ऐकू असे सांगितले. त्यामुळे आम्ही तो अर्ज दुपारी १.३० वाजता मागे घेतला. आता अलिबाग सेशन्स कोर्टात जामीन अर्जावरील सुनावणीसाठी प्रयत्न आहे. गोस्वामी यांनी गजाआड राहणे, प्रत्येक सेकंदासाठी बेकायदा आहे.
नाईक कुटुंबीय न्यायालयात
दरम्यान अर्णब गोस्वामी प्रकरणात दिवंगत अन्वय नाईक यांची कन्या आज्ञा नाईक यांनीही मुंबई हायकोर्टात धाव घेऊन पोलिसांनी गेल्या वर्षी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला फौजदारी रिट याचिकेद्वारे आव्हान दिले. अर्णब गोस्वामी यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी आणि त्वरित सुटका होण्यासाठी केलेल्या फौजदारी रिट याचिकेसोबतच आज्ञा नाईकच्या याचिकेवरही मुंबई हायकोर्टात न्या. संभाजी शिंदे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे.
अर्णबसाठी शाळेत बनवला कृत्रिम तुरुंग
इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात काल, बुधवारी अटक करण्यात आलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी अलिबागमधील एका शाळेत उभारलेल्या तात्पुरत्या तुरुंगात रात्र काढली. अलिबागमधील न्यायालयाने गोस्वामी आणि अन्य दोन आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी या तात्पुरत्या तुरुंगात करण्यात आली होती. पोलिसांनी गोस्वामी यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी विनंती न्यायालयाकडे केली होती. मात्र, पोलीस कोठडीची आवश्यकता नाही असे सांगून ही विनंती फेटाळली होती. एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, अर्णब गोस्वामी यांना वैद्यकीय तपासणीसाठी बुधवारी रात्री सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत नेण्यात आले. या शाळेत तात्पुरते तुरुंग उभारण्यात आले आहे. येथील कोठडीत त्यांनी रात्र काढली.