MarathawadaNewsUpdate : कोरोनामुळे बीड जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांच्या मृत्यू

बीड जिल्हा कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांचं कोरोनामुळे निधन झालं असल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे बीड जिल्हा कारागृहात तब्बल ६५ कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी जीवाची बाजी लावून कारागृह अधीक्षक संजय कांबळे यांनी सगळ्याच कैद्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते आणि त्यात त्यांना यशही आले होते. मात्र दरम्यानच्या काळात काही दिवसांपूर्वीच संजय कांबळे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्यावर बीड शहरातील लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मंगळवारी ते उपचार करून घरी परतले असता संजय कांबळे यांची बुधवारी पहाटे प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. ते एक उत्तम साहित्यिकही होते.
संजय कांबळे मुंबई असताना मुंबई बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी अजमल कसाब याची सुरक्षा व्यवस्था त्यांच्या नियंत्रणात होती. ही मोठी जबाबदारी त्यांनी उत्कृष्टरित्या सांभाळली होती. मुंबईनंतर मागील काही महिन्यापासून ते बीड येथे जिल्हा कारागृहाचे अधिक्षक म्हणून काम पाहत होते. शिवाय अभिनेता संजय दत्त याच्या सेलचे ते प्रमुख राहिले होते. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर त्याचा बीड जिल्ह्यातही फैलाव झाला होता. सप्टेंबर महिन्यात एकाच दिवशी बीड कारागृहातील 50 हून अधिक कैद्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती कारगृह अधीक्षक संजय कांबळे यांनी एखाद्या कोरोना यौद्धासारखी हाताळली होती. व्यवस्थीत नियोजन करून संजय कांबळे यांनी सगळ्याच कैद्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं होतं. मात्र, स्वतः संजय कांबळे कोरोनाशी सुरु असलेली लढाई जिंकू शकले नाही.