MaharashtraNewsUpdate : न खाऊंगा , न खाने दूंगा : लष्कर भरतीतही , उकळले पैसे , पुणे पोलिसांनी उघड केले रॅकेट , तिघांना अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी न खाऊंगा , न खाने दूंगा , असा नारा दिला असला तरी , थेट लष्कर भरतीमध्येच परीक्षेत पास करून देतो म्हणत तरुणांना गंडवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. पोलीस तपासानुसार आरोपींनी तब्बल १९ मुलांची फसवणूक करत पैसे उकळले असल्याचे वृत्त असून या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये लष्कर भरती विभागातील एका कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेनसिंग लालासिंग रावत (वय ४५ रा. पिंगळे वस्ती, मुंढवा, रवींद्र राठोड रा राजस्थान) आणि रिक्रुटमेंट ऑफिसमधील कर्मचारी जयदेव सिंह परिहार असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वानवडी येथे होणाऱ्या सैन्य भरतीच्या लेखी परीक्षेत काही मुलांची लाखो रूपयांची फसवणूक करण्याच्या तयारीत काही जण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वेनसिंग लालासिंग रावत, रवींद्र राठोड आणि लष्करातील हवालदार जयदेव सिंह परिहार यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं. त्यांची चौकशी करण्यात आल्यानंतर तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
या विषयी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले कि , हवालदार जयदेव सिंह परिहार यांनी कॅम्प येथील लष्कराच्या कार्यालयात परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यास आलेल्या त्यातील काहींना हेरून, “माझी लष्करातील मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे. मी तुम्हाला पास करून देतो,” असं सांगितलं. तसेच “तुमचे काम झाल्यावर मला प्रत्येकी एक ते दोन लाख द्या,” असं सांगून त्या मुलांचे मूळ कागदपत्र स्वत:च्या ताब्यात घेतले. तसेच मागील पंधरा दिवसापासून मुलांचे लोहगाव या ठिकाणी शिक्षक नेमून क्लास घेण्यात आले. हा सर्व प्रकार ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून समोर आला आहे.अधिक तपास चालू आहे.