MumbaiCrimeNewsUpdate : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार , पोलिसांनी केले गजाआड

सावत्र बापानेच १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालाडमध्ये घडली आहे. आईच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी ४५ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. १८ ऑक्टोबर रोजी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी पीडित मुलगी आणि तिची आई घरात झोपल्या होत्या.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, तिच्या पतीने आधी मुलीचे तोंड दाबले आणि त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. जेव्हा ती झोपेतून जागी झाली त्यावेळी मुलगी रडत होती. तिच्या शरीरावर चावा घेतल्याच्या खुणा होत्या. याबाबत तिला विचारलं असता, तिने घडलेला प्रसंग सांगितला. याबाबत मी पतीला विचारणा केली त्यावेळी त्याने मला मारहाण केली. त्यानंतर तो घरातून पसार झाला, असेही महिलेने सांगितले.
मालवणी पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेने तिच्या आईला सर्व हकिकत सांगितली. काही महिन्यांपासून तो अत्याचार करत होता. पण मी खूप घाबरले होते. त्यामुळे कुणालाही याबाबत सांगितले नाही, असे त्या मुलीने आईला सांगितले. या प्रकरणी पीडिता आणि तिच्या आईने मालवणी पोलिसांत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात कलम ३७६, ३७६ (२) एन, कलम ३२४, कलम ३२३, कलम ५०४ आणि पॉक्सो कायद्यांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.