AurangabadCrimeUpdate : शहर हादरले, निर्घृण हत्येच्या दोन घटना , दोघांनाही धारदार शस्त्राने भोसकले

औरंंंगाबाद : पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शहरात दोन ठिकाणी एकाच दिवशी दोन जणांची निर्घूणपणे हत्या झाल्यामुळे शहर हादरून गेले आहे. पडेगाव परिसरात राहणा-या एका फायनान्स कंपनीत काम करणा-या परराज्यातील मन्टूस कुमार सिंग (वय ३०) याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. तर एमआयडीसी वाळूज परिसरातील कमळापूर येथील रहिवासी भिमराव दिगंबर सावते (वय ३४) यांचाही धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्टुस कुमार सिंग (वय ३०, रा.फ्लॅट क्रमांक १३, पिस सोसायटी, पडेगाव परिसर) हे शहरातील एका फायनान्स कंपनीत काम करीत होते. बुधवारी दुपारी मन्टुस कुमार सिंग यांचा मित्र बबलू त्यांची दुचाकी देण्यासाठी घरी आला होता. त्यावेळी मन्टुस कुमार सिंग यांच्या घराचा दरवाजा आतून बंद होता, बराच वेळ दार वाजवूनही दरवाजा उघडला जात नसल्याने मन्टुस कुमार सिंग यांच्या मित्राने या घटनेची माहिती छावणी पोलिसांना आणि शेजा-यांना दिली. छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोज पगारे, उपनिरीक्षक सचिन वायाळ हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेजा-यांच्या मदतीने मन्टुस कुमार सिंग यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी मन्टुस कुमार सिंग सोफ्यावर बसलेल्या अवस्थेत होता, आणि त्याच्या पोटावर धारदार शस्त्रांनी वर केल्याचे दिसत होते. तर सोफ्याखाली रक्ताचे थारोळे साचलेले होते. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
खूनाची दुसरी घटना
दुस-या घटनेत, एमआयडीसी वाळूज परिसरातील कमळापूर येथील रहिवासी भिमराव दिगंबर सावते (वय ३४) यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. भिमराव सावते बुधवारी दुपारी घरात एकटे असल्याची संधी साधून घरात शिरलेल्या मारेक-याने सावते यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक मधुकर सावंत, सहाय्यक निरीक्षक गौतम वावळे आदींनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल
पडेगाव आणि एमआयडीसी वाळूज परिसरातील कमळापूर येथे खून झाल्याची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, छावणी विभागाचे सहाय्यक आयुक्त विवेक सराफ, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. दिनेशकुमार कोल्हे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड, सहाय्यक निरीक्षक अजबसिंग जारवाल आदींनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.