MarathwadaNewsUpdate : मोठी बातमी : वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना तब्बल दहा लाखांची लाच घेतांना अटक

वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना तब्बल दहा लाखांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने बीड जिल्ह्यासह राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आज अशोक जैन यांच्या परळी येथील राहत्या घरी औरंगाबाद लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून धाड टाकली तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला.
या विषयीची अधिक माहिती अशी कि , वैद्यनाथ बँकेने कळंब येथील बँकेच्या एका सभासदाला अंदाजे अडीच कोटी रुपयाचे कर्ज प्रकरण मंजूर केले होते त्या प्रकरणी चेअरमन अशोक जैन याने १५ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यानंतर आज १५ लाखांच्या रक्कमेपैकी १० लाख रूपये आज दुपारी २ वाजेच्या सुमारास चेअरमन अशोक जैन यांच्या निवासस्थानी देण्याचे ठरले होते. ठरलेल्या वेळेनुसार, तक्रारदार १० लाखांची रक्कम घेऊन अशोक जैन यांच्या घरी पोहोचला. त्यावेळी औरंगाबाद येथील लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. यावेळी १० लाखांची लाच घेत असताना अशोक जैन यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वैद्यनाथ सहकारी बँकही भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात आहे.
➡️ *सापळा अहवाल* ⬅️
▶️ युनिट- औरंगाबाद
▶️ तक्रारदार- पुरुष, वय-48, व्यवसाय – किराणा दुकान व शेती
▶️ आरोपी श्री.अशोक पन्नालाल जैन, वय- 52, व्यवसाय – व्यापार तथा चेअरमन, द वैद्यनाथ अर्बन बँक.
▶️ लाचेची मागणी- 15,000,00/- रूपये.
▶️ लाच स्विकारली- 10,000,00/- रुपये.
▶️ हस्तगत रक्कम- 10,000,00/- रूपये.
▶️लाचेची मागणी पडताळणी –
दिनांक 29.09.2020 व
दिनांक 10.10.2020 रोजी
▶️लाचेचे स्वीकृती
दिनांक 19.10.2020 रोजी
▶️ कारण – तक्रारदार यांचे सन 2018 मध्ये सी सी अकाउंट चे अडीच कोटी रुपये कर्ज मंजूर केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांचेकडे रु. 15,000,00/- मागणी करून, रु.10,000,00/- ही प्रत्यक्ष स्वीकारून उर्वरित रू.5,000,00/- नंतर घेण्याचे सांगितले , आलोसे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
▶️ सापळा अधिकारी-श्री. गणेश धोक्रट, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.
औरंगाबाद. श्री पोना. विजय बाम्हंदे, सुनील पाटील, मिलिंद इप्पर, पोशि. विलास चव्हाण, चागंदेव बागुल, ला. प्र. वि. औरंगाबाद
▶️मार्गदर्शक-मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, मा.डाॅ. अनिता जमादार, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. औरंगाबाद.