MumbaiNewsUpdate : कंगना आणि तिच्या बहिणीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल , त्यानंतरही ” पप्पू सेना ” असा उल्लेख करीत केले ट्विट !!

वांद्रे न्यायालयाने कलम १५६ (३) अंतर्गत कंगनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि आणि तिच्या बहिणीविरोधात १२४ अ (राजद्रोह) यासह विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी याबाबत माहिती दिली. हिंदू आणि मुस्लीम या दोन समुदायांमध्ये परस्परांविषयी द्वेष निर्माण होईल आणि जातीय सलोखा बिघडेल, अशा हेतुने वारंवार ट्वीट करत असल्याच्या आरोपांप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत व तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याचे निर्देश वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आज दिले होते. त्या आदेशानुसार कंगना व तिच्या बहिणीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. त्यानंतरही ” पप्पू सेना ” असा उल्लेख करीत तिने ट्विट केले आहे.
बॉलीवूड मधील कास्टिंग डायरेक्टर मुनावरअली सय्यद यांनी अॅड. रवीश जमींदार यांच्यामार्फत दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार दिली होती. त्याविषयीच्या सुनावणीअंती न्यायाधीश जयदेव घुले यांनी सर्व ट्वीट्स पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी दखलपात्र गुन्हा दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवून पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला होता. याचिकाकर्त्याने न्यायालयात कंगनाच्या आक्षेपार्ह ट्वीटचा तपशील सादर केला आहे. पालघरध्ये दोन साधूंची जमावाने हत्या केल्यानंतर त्यावर कंगनाने आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं. त्यानंतर मुंबई पालिकेने कंगनाच्या बंगल्यातील अतिक्रमण तोडले असता तिने ‘बाबर सेना’ असा उल्लेख करत ट्वीट केले होते. बॉलीवूडवरही अनेक वादग्रस्त ट्वीटची मालिकाच तिने लावली होती. या सर्वावर बोट ठेवत याचिकाकर्त्याने कारवाई करण्याची मागणी केली होती.
Who all are fasting on Navratris? Pictures clicked from today’s celebrations as I am also fasting, meanwhile another FIR filed against me, Pappu sena in Maharashtra seems to be obsessing over me, don’t miss me so much I will be there soon ❤️#Navratri pic.twitter.com/qRW8HVNf0F
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) October 17, 2020
दरम्यान या एफआयआरवर कंगनाने पुन्हा ट्विट करून आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे कि , “पप्पू सेनेला माझ्याशिवाय करमत नाही का?” “कोण कोण नवरात्रीमध्ये उपवास करणार आहे? आज नवरात्रीच्या निमित्ताने काढलेले हे फोटो पाहा. मी देखील उपवास ठेवणार आहे. माझ्यावर आणखी एक एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात पप्पू सेनेला माझ्याशिवाय काहीच दिसत नाही. माझी जास्त आठवण काढू नका. मी लवकरच येतेय.” या ट्विटच्या माध्यमातून तिने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. यावरूनही पुन्हा एक गुन्हा दाखल होतो कि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.