MarathwadaCrimeUpdate : नात्याने चुलत आजोबा असलेल्या वृद्धाने घेतला चिमुकल्याचा बळी

परभणी जिल्ह्यात आजोबानेच सात वर्षीय नातवाचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेत ५२ वर्षीय आरोपीने धारधार विळ्याने आपल्या नातवाच्या पोटावर वार करून त्याची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिगंबर जाधव याला अटक केली आहे. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील चिकलठाणा बुद्रुक येथे हा धक्कादायक प्रकार घडला. अभिराज श्रीराम जाधव हा ७ वर्षीय चिमुकला आपल्या घरासमोर खेळत असताना त्याचे चुलत आजोबा दिगंबर जाधव याने प्रारंभी अभिराज याचा गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हातातील विळ्याने त्याच्या पोटावर सपासप वार केले. आजूबाजूच्या लोकांना हा प्रकार लक्षात येताच अभिराजला सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचे निधन झाले. घडलेल्या प्रकारामुळे गावांमध्ये दहशतीचं वातावरण असून, या निर्दयी आजोबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र त्याने या चिमुकल्या नातवाचा बळी का घेतला, यामागचं कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.