Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारबाबत केला मोठा धमाका….

Spread the love

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी  ‘महाराष्ट्रात डिसेंबर महिना सुरू होण्याआधी राष्ट्रपती राजवट लागू होईल’, असे भाकीत करून प्रकाश आंबेडकर यांनी खळबळ उडवून दिली असून कोणत्या आधारावर राष्ट्रपती राजवटीचा निर्णय  होणार आहे, याचा तर्कही प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. केंद्र विरुद्ध महाराष्ट्र सरकार या संघर्षातून राज्यात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागेल, अशी शक्यता आंबेडकर यांनी वर्तविली आहे. या विधानामुळे पुन्हा एकदा राज्यातील राष्ट्रपती राजवटीची चर्चा सुरु झाली आहे. भाजपकडूनही या विषयीचे फटाके फोडले जात होते. आता प्रकाश आंबेडकर यांनीही याबाबत मोठे विधान केले आहे. टीव्ही ९ या वृत्त वाहिनीशी ते बोलत होते.

केंद्र सरकारच्या निर्णयांना विरोध केल्यामुळे हि परिस्थिती राज्यावर ओढवू शकते असे यामागचे तर्कट आहे . केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्याने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. याबाबत विचारविनिमय करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे. या बिलावरून शेतकऱ्यांच्या हिताचे असेल तेच आम्ही स्वीकारू. शेतकऱ्यांच्या हितांशी तडजोड आम्हाला मान्य नाही, अशी रोख ठोक भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. शिवाय महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांचाही या कृषी कायद्यांना ठाम विरोध आहे. त्यावर बोट ठेवत आंबेडकर यांनी हे महत्त्वाचे विधान केले आहे. राज्य सरकार सातत्याने केंद्राच्या विरोधात भूमिका घेत आहे. केंद्राचे कायदे नाकारले जात आहेत. देशात सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू आहे. अनेक निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. केंद्राने मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. सामान्यांना आजही लोकलची प्रतीक्षा आहे, असे नमूद करत आंबेडकर यांनी राष्ट्रपती राजवटीची शक्यता वर्तवली.

आंबेडकर म्हणाले कि , प्रत्यक्षात घटनेनुसार राज्याला केंद्र सरकारच्या विरोधात जाता येत नाही. पण, महाराष्ट्रात मात्र तसे सातत्याने घडत आहे. त्यामुळे त्यातून एक वेगळाच संघर्ष सुरू झाला असून यातून महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे ढकलला जात आहे. डिसेंबर महिना सुरू होण्यापूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. बिहार निवडणुकीनंतर ते पाऊल उचलण्यात येईल, असे आंबेडकर यांचे भाकीत आहे. आंबेडकर एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. आंबेडकर यांच्या या भाकीताने राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटण्याचे चिन्हे आहेत. दरम्यान, प्रकाश आंबेडकर हे सातत्याने लॉकडाऊन विरोधात भूमिका घेत आहेत. लॉकडाऊन हटवायला हवं यासाठी त्यांनी अनेक प्रकारे आंदोलनही केलेले आहे. सलून बंद असताना ती उघडण्याच्या मागणीसाठी अकोला येथे आंबेडकर यांनी केस कापून घेत अभिनव आंदोलन केले होते. त्यानंतर मंदिरे व धार्मिक स्थळे उघडली जावी म्हणूनही ते सातत्याने आग्रही आहेत. पंढरपुरात मंदिरांसाठी झालेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!