IndiaNewsUpdate : भाजप नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या, शरीराची झाली अक्षरशः चाळणी

पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा भागाततील भाजप नगरसेवक आणि स्थानिक नेते मनीष शुक्ला एका चहा टपरीजवळ गप्पा मारत उभे असतानाच तोंडाला मास्क लावलेले हल्लेखोर आले आणि त्यांनी थेट गोळ्या झाडायला सुरुवात केली. १४ गोळ्या शरीरात घुसल्याने मनीष शुक्ला यांच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली होती. त्यांच्या हत्येमुळे संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली असून विरोधी पक्षांनी आज १२ तासांचा बंद पुकारला होता. मनीष शुक्ला उत्तर २४ परगणा भागात तिटागढ इथे एक कार्यकर्त्यांची बैठक संपवून घरी निघाले होते. हाब्रा इथे पक्षाच्या बैठकीकरता ते गेले होते. त्या वेळी काही लोकांबरोबर चहाच्या टपरीवर बोलत उभे असताना हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी त्यांच्यावर अगदी जवळून नेम साधत गोळीबार केला.
तृणमूल काँग्रेसने हा राजकीय खून केल्याचा भाजपचा आरोप आहे. तर सत्ताधारी तृणमूलने तो फेटाळून लावत भाजपच्या अंतर्गत वादातून ही हत्या झाल्याचं म्हटलं आहे. मनीष शुक्ला हे भाजप खासदार अरुण सिंह यांचे निकटवर्तीय समजले जातात त्यामुळे राजकीय वैमनस्यातून खून झाल्याचं बोललं जात आहे. या खुनाचा तपास CID कडून करण्यात येत आहे. मनीश शुक्ला यांच्या प्राथमिक ऑटोप्सीचा अहवाल आला आहे. त्यात त्यांच्या शरीरावर १४ गोळ्या झाडल्याचं स्पष्ट झालं आहे. या गोळ्या 7mm च्या पिस्तोलमधून झाडण्यात आल्या होत्या . हल्लेखोरांनी इतक्या जवळ येऊन गोळीबार केला की, 3 गोळ्या थेट त्यांचं कपाळ भेदून गेल्या. शुक्ला यांच्या शरीराची अक्षरशः चाळण झाली होती, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
https://twitter.com/jdhankhar1/status/1313085219507900422
दरम्यान राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचं सांगत राज्यपालांनीही या प्रकरणात आपणहून लक्ष घातलं आहे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केलं आहे. रात्री या विषयावर तातडीने बोलायचं असल्याचा संदेश राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवला होता. पण ममता बॅनर्जी यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा राज्यपालांंचा आरोप आहे. राज्यपाल जगदीप धनकार यांनी राज्याचे पोलीस महासंचालक वीरेंद्र यांना गृह सचिवांसह राजभवनावर येण्याचे आदेश धाडले आहेत. तसं Tweet खुद्द राज्यपालांनीच केलं आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका जवळ आल्यामुळे आता हे हत्या प्रकरण आणखी मोठं होणार अशी चिन्हं आहेत. या हत्येचा दहशतवादाच्या अँगलनेही तपास व्हायला हवा, असं राज्यपालांनी म्हटलं आहे.