IndiaCrimeNewsUpdate : संतापजनक : कोरोनाबाधित तरुणीवर रुग्णवाहिकेत केला बलात्कार , चालकाला ठोकल्या बेड्या

केरळमध्ये एका रुग्णावाहिकेच्या चालकानेच कोरोनाबाधित १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना केरळच्या पटनमिठ्ठाच्या अरममुला परिसरात घडली असल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रुग्णवाहिका चालकाला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार तरुणीसह रुग्णवाहिकेमध्ये आणखी एक रुग्ण होता परंतु त्याला मध्येच उतरवण्यात आले . दरम्यान रुग्णवाहिकेत पीडित तरुणी एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिला कोविड केअर सेंटरमध्ये सोडलं. एका बाजूला लोक कोरोनामुळे त्रस्त असून दुसऱ्या बाजूला काही विकृत लोक राक्षसी वर्तनाने मानवतेच्या नात्याला कलंकित करीत आहेत. अर्थात हि घटना म्हणजे संपूर्ण व्यवस्थेसमोर प्रश्न आहे. तरुणीला कोविड सेंटरमध्ये दाखल केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि त्यानंतर आरोपी चालकाचा शोध घेत त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.