IndiaNewsUpdate : संतापजनक : पुन्हा एकदा खाप पंचायत : महिलेला निर्वस्त्र करीत तिला सार्वजनिकरित्या शेकडो लोकांसमोर घातली आंघोळ !!

राजस्थानातील खाप पंचायतीने मानवतेच्या संकेतांना पायदळी तुडवीत एका महिलेवर आपल्याच कुटुंबातील एका तरुणासोबत अवैध संबंध असल्याचाआरोप लावून त्यांना सार्वजनिक शिक्षा सुनावली . खाप पंचायतीने तिला दिलेली शिक्षा माणुसकीला काळीमा फासणारी आहे. खाप पंचायतीवर आरोप आहे की त्यांनी कथित आरोपी महिलेला आणि तरुणाला निर्वस्त्र करीत त्यांना सार्वजनिकरित्या शेकडो लोकांसमोर आंघोळ घातली. २१ ऑगस्ट रोजी झालेल्या या घटनेनंतर मंगळवारी सांसी समाजाने पोलीस अधीक्षकांना आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी १० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे .
या प्रकरणी अखिल राजस्थान सासी समजाचे सुधारक आणि विकास न्याय प्रदेश अध्यक्ष सवाई सिंह मालावत यांनी सोमवारी सासी समाजातील लोकांसह पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवली आहे. याबाबत सांगितले जात आहे की, ही घटना २१ ऑगस्ट रोजी राजस्थानातील सोला गावात झाली. येथे सासी समाजातील एक महिला आणि दीराच्या मुलाला ( पुतण्याला ) सार्वजनिकरित्या आंघोळ घालण्यात आली. खाप पंचायतीने महिलेवर आरोप लावला आहे की, तिचे कुटुंबातील तरुणासोबत (पुतण्यासोबत ) अवैध संबंध आहेत. यादरम्यान ४०० लोक जमा होते. मात्र कोणीच याचा विरोध केला नाही. यादरम्यान नग्न अवस्थेत महिलेचे फोटो काढण्यात आले आणि व्हिडीओही बनविण्यात आला. खाप पंचायतीने महिलेला २२ हजार आणि त्याच्या पुतण्याला ३१ हजाराचा आर्थिक दंड ठोठावला आहे. समाजाने पोलिसांकडे मागणी केली आहे की, गुन्हा दाखल करीत आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. खाप पंचायतीत जे लोक सहभागी होते, त्यांच्याकडून ५१ हजार रुपये घेऊन पीडित महिलेला परत केले जावे, अशी मागणी केली आहे. याशिवाय तेथे उपस्थित असलेल्या लोकांविरोधात कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी केली जात आहे. या प्रकरणात सुरेश कुमार, नेमाराम सांसी और अमीरचंद यांना अटक करण्यात अली असून अधिक तपास चालू असल्याची माहिती जिल्ह्याचे एसएसपी डॉ. देवेन्द्र शर्मा यांनी दिली आहे.