MaharashtraNewsUpdate : प्रकाश आंबेडकरांचा दणका, हिंदुत्ववादासंबंधीच्या प्रश्नावर दिले “हे” उत्तर….

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर खुले करा या मागणीसाठी आंदोलन करीत विठुरायाचे मुखदर्शन घेत सरकारला प्रकाश आंबेडकरांनी आणि राज्यातील वारकऱ्यांनी चांगलाच दणका दिला . या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मुखदर्शनाची परवानगी देत लवकरच मंदिरं खुली करण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील सर्वसामान्य वारकऱ्यांचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली. दरम्यान ‘वंचित बहुजन आघाडीनं हिंदुत्वाचा मार्ग स्वीकारला आहे का ? या प्रश्नाचं उत्तर देताना आंबेडकर म्हणाले “आम्ही ज्या महापुरुषांना मानतो त्यांनी कधीही धर्म नाकारला नाही. धर्माचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे.”
राज्य सरकारने मंदिरं सुरु करावीत या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि वारकऱ्यांनी घोषित केल्याप्रमाणे आज पंढरपुरात प्रतीकात्मक आंदोलन केले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तगादा बंदोबस्त ठेवला खरा परंतु आंदोलकांची भूमिका लक्षात घेता अतिशय संवेदनशीलतेने या सर्व आंदोलनाला हाताळले. आणिआंदोलनाआधीच प्रकाश आंबेडकर यांच्यासह १५ जणांना नियम पाळून मुखदर्शनाची परवानगी देण्यात आली. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी आपले आंदोलन मागे घेतले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनला विशिष्ट कालावधीनंतर प्रकाश आंबेडकरांनी विरोध सुरू केला होता. लोकांनी बिनधास्त नातेवाईकांना भेटावे. नेहमीप्रमाणे कामे करावीत, असं आवाहनही त्यांनी केलं होतं. मोबाइलवर सतत वाजणाऱ्या करोनाच्या कॉलर ट्यूनलाही विरोध करत त्यामागे काहीतरी षडयंत्र असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्याच भूमिकेच्या अनुषंगानं त्यांनी राज्यातील मंदिरं उघडण्याची मागणी केली होती.
विठ्ठलाच्या मुखदर्शनांनंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फुले शाहू आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या ‘वंचित’नं मंदिरांच्या प्रश्नावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना यावेळी हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर आपली भूमिका मांडताना ते म्हणाले कि , ‘महात्मा फुले, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही गुरू मानतो. या तिघांनीही कधी धर्म नाकारला नाही. धर्म अविभाज्य अंग आहे, असं त्यांचं मत होतं. आम्ही त्यांच्या विचारानं चालतो. कोणी कोणाला मानायचं याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. इतर कोणी ते लादू शकत नाही किंवा लादू नये,’ असं ते म्हणाले. ‘वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे. मात्र नियमांमुळं त्यांची अडचण होतेय. हे लक्षात घेऊन आम्ही आंदोलन केलं.’
संजय राऊत यांनाही दिले उत्तर
प्रकाश माबेडकर यांच्या आंदोलनावर बोलताना दुपारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी , “नेते नियम मोडून आत जाऊ सांगत आहेत. प्रकाश आंबेडकर एक संयमी नेते आहेत. कायद्याचे जाणकार आणि अभ्यासक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते वारसदार आहेत. अशा प्रमुख व्यक्तीकडून कायदेभंगाची भाषा करणं लोकांना हुसकावण्यासारखं आहे. विरोधक आणि मंत्री एकत्रित मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे,” असं संजय राऊत बोलले आहेत. “लोकांना वेठीस धरु नये. परिस्थती सुधारत असून त्यात तणाव निर्माण होता कामा नये,” अशी प्रतिक्रया दिली होती त्यावर, प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया देताना , “संजय राऊत यांनी अभ्यास सुरु केला आहे ही चांगली गोष्ट आहे, पण त्यांचा अभ्यास पूर्ण झालेला नाही. सरकार ज्यावेळी काही करत नाही त्यावेळी याच घटनेने जनतेला सरकारला काय केलं पाहिजे हे सांगण्याचा अधिकार दिला आहे हे त्यांना माहिती नाही,” असा टोला लगावला.