AurangabadCrimeUpdate : बनावट नियुक्तीपत्राआधारे न्यायालयाची फसवणूक , गुन्हा दाखल

बनावट नियुक्तीपत्राआधारे कंपनीचा कामगार असल्याचा खोटा दावा करुन कंपनीसह कामगार न्यायालयाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार १३ डिसेंबर २०१९ रोजी घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन गंगाधर दगडू भोसले (४५, रा. जयभवानीनगर, एन-४, सिडको) याच्याविरुध्द एमआयडीसी सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिकलठाणा एमआयडीसीमध्ये त्रिमुर्ती एंटरप्राईजेस नावाची कंपनी आहे. या कंपनीचे मालक साईनाथ रंगनाथ आहेर (५७, रा. ब्लू वेल्स सोसायटी) हे आहेत. त्यांच्या कंपनीचे बनावट लेटरपॅड तयार केले. तसेच कंपनी मालक आहेर यांची बनावट स्वाक्षरी व शिक्के मारुन त्याआधारे नियुक्तीपत्र तसेच सप्टेंबर २०१६ चे बनावट पगारपत्रक तयार केले. या कागदपत्रांचा गैरवापर करुन गंगाधर भोसलेने कंपनीविरुध्द कामगार उपायुक्त कार्यालयात खोटा दावा ठोकला. हा प्रकार उघडकीस आल्यावरुन कंपनी मालक आहेर यांनी त्याच्याविरुध्द एमआयडीसी सिडको पोलिसात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय मान्टे करत आहेत.