MarathwadaNewsUpdate : ह्रदयद्रावक : पोहोण्याच्या नादात , दोन वेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून ८ जणांचा मृत्यू , तीन भावंडांचा समावेश

औरंगाबादमध्ये तलावात पोहण्यासाठी उतरण्याचा मोह पाच तरुणांच्या जीवावर बेतला. यामध्ये तीन भावंडांचाही समावेश आहे. हे तरुण कोबी काढण्यासाठी आले होते. परत जाताना नाथनगर तलाव येथे आंघोळ करण्यासाठी ते तलावात उतरले. यावेळी दुर्दैवाने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भालगाव येथेल राहणारे हे तरुण कोबी काढण्यासाठी वरझडी तालुका औरंगाबाद येथे गेले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भालगाव येथे परतत असताना नाथनगर तलाव येथे आंघोळ करण्यासाठी थांबले. तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने पाचही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने पाचही मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून घाटी दवाखाना औरंगाबाद येथे पाठविण्यात आले. मृतांमध्ये तीन भावंडांचा समावेश आहे.
मृतांची नावे –
1) समीर शेख मुबारक (१७)
2) शेख अन्सार शेख सत्तारा (१७)
3) आतीक युसुफ शेख (१८)
4) तालेब युसुफ शेख (२१)
5) सोहेल युसुफ शेख (१६)
उमरगा तलावात दोन मुली आणि एका मुलाचा बुडून मृत्यू
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत उमरगा तालुक्यातील दयानंद नगर तांडा शिवारात शिवारात मुरूम काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून ३ अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. यात दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. प्रतीक्षा मधुकर पवार (वय १२), ओंकार राजूदास पवार (वय १२) आणि अंजली संतोष राठोड (वय १३) अशी मृत मुलांची नावे आहेत. ही मुले गुरुवारी दुपारी शिवारात फिरत फिरत गेली होती. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला मुरूम काढण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडाली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील कोळसूर येथील दयानंदनगर तांडा शिवारात ही घटना घडली आहे. लॉकडाउनच्या काळात पुणे येथून गावाकडे आलेली प्रतीक्षा आणि तिच्यासह ओंकार आणि अंजली हे गुरुवारी दुपारी गावातील रस्त्याने फिरत फिरत शिवारात पोहोचले. तेथे रस्त्याच्या कडेला राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुरूम काढण्यासाठी खड्डा खोदला होता. या खड्ड्यात पाणी साचले होते. त्यात हे तिघेही पडले आणि त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, बीट अंमलदार वाल्मिक कोळी आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढले. या घटनेने उमरगा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.