खांद्यावर डोली करून घेऊन गेलेल्या महिलेचे असेही एक बाळंतपण…

रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यातील मौजे पेढांबे वाडी या धनगर वाडीत एक गर्भवती महिलेला खांद्यावरून डोलीतून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना घनदाट जंगलात वाटेतच त्या महिलेची प्रसूती झाली आहे. या महिलेला जंगलातच ठेऊन गावातून आशा सेविकांना बोलावण्यात आले आणि घनदाट जंगलात पावसाच्या दिवसात या महिलेची प्रसूती झाली. सदर बाळंतीण महिला आणि तिने जन्म दिलेले बाळ आता सुखरूप आहे.
या विषयी अधिक माहिती अशी कि , चिपळूण तालुक्यातील या गावात जाण्यासाठी रस्ता नाही. डोंगर कपारीत वसलेल्या या वाडीत २० ते २५ घरे आहेत. मात्र अनेकवेळा मागणी करून देखील या वाडीत रस्ता गेला नाही. या ठिकाणी जर कोण आजारी पडलं तर त्यांना प्राचीन पद्धतीने डोली करावी लागते आणि त्यातून जवळपास ५ ते ६ किलोमीटर खांद्यावरून न्यावे लागते. अशा प्रकारे शनिवारी सकाळी या वाडीतील एक गर्भवती महिलेला वेदना जाणवू लागल्या आणि त्या महिलेला नेहमीप्रमाणे डोलीतून दवाखान्यात घेऊन जात असताना अर्ध्या वाटेतच घनदाट जंगलात त्या महिलेची प्रसूती झाली. सौ मनीषा संतोष शेळके असे या महिलेचे नाव आहे.