धक्कादायक : भिवंडी स्मशानभूमीत मृतदेहांची नोंद न करताच अंत्यसंस्कार

भिवंडी शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूची संख्याही झपाट्याने वाढत आहे. तर शहरातील स्मशानभूमीत किती कोरोनाबाधित रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यात आले याची माहितीच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. एवढंच नाहीतर स्मशानभूमीत हँडग्लोजचा खच पडला आहे. दरम्यान स्मशानभूमीच्या परिसरात आलेल्या नागरिकांनी वापरलेल्या पाण्याच्या बाटल्या तसेच मोठे घाणीचे साम्राज्य पसल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान भिवंडी शहरात महानगर पालिकेच्या २० स्मशानभूमी आहे. फक्त एक वगळता सर्व स्मशानभूमीमध्ये कोणत्याच प्रकारे सुरक्षारक्षक नसल्याने रोज किती आणि कुठले मृतदेह अंत्यसंस्कारासाठी येतात याची नोंद होत नसून त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नक्की मृत्यूचा आकडाही समजू शकत नाही. त्यातच धक्कादायक प्रकार म्हणजे, स्मशानभूमीत आणि बाहेर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांसाठी वापरलेल्या हॅंडग्लोजचा खच पडला आहे. एवढंच नाहीतर स्ट्रेचर सुद्धा इ फेकण्यात आलेले आहे. भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाचे ८१ नवे रुग्ण आढळले असून २रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ग्रामीण भागात ३६ नवे रुग्ण आढळले आहेत. शहर व ग्रामीण भागात एकूण ११७ नवे रुग्ण आढळले आहेत.
भिवंडी शहरात आतापर्यंत ८७५ रुग्ण आढळले असून त्यापैकी ४४९ रुग्ण बरे झाले आहेत तर ६६ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ३६१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत ३८७ रुग्ण आढळले असून त्यापैकी १४७ रुग्ण बरे झाले आहेत तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला असून २३२ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, शनिवारी आढळलेल्या ११७ नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा १२६२ वर पोहोचला असून त्यापैकी ५९५ रुग्ण बरे झाले आहेत. तर ७४ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५९३ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार उडवला आहे. भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज आलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल १५४१३ रुग्ण आढळून आली आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभरात लॉकडाउन करण्यात आलं होतं. लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी अनलॉक करण्यात आले आहे. देशात बंद पडलेले व्यवहार सुरू झाले आहे. परंतु, कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४,१०,४६४ वर पोहोचली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १, ६९, ४५१ इतकी आहे. गेल्या २४ तासामध्ये १५, ४१३ रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंतही ही सर्वाधिक रुग्णांची संख्या असल्याचं समोर आले आहे. तर देशभरात 306 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी गेल्या २४ तासातील असून चिंताजनक आहे. तर देशभरात आतापर्यंत एकूण १३, २५४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.