MarathawadaNewsUpdate : हिंगोलीत पोलीस शिपायाची आत्महत्या

हिंगोलीत कर्तव्यावर असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलनं गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेनं पोलिस दलात खळबळ उडाली आहे. जितेंद्र साळी (वय-43) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शनिवारी (ता. 20) दुपारी ही घटना घडली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि , हिंगोली येथील पोलिस मुख्यालयातील शस्त्र दुरुस्ती विभागात जितेंद्र साळी हे कार्यरत होते. शनिवारी दुपारच्या सुमारास ते विभागात कामासाठी आले होते. त्यानंतर दुपारी त्यांनी कार्यालयातच रायफलने हनुवटीत गोळी झाडून आत्महत्या केली. मुख्यालयातून गोळी झाडल्याचा मोठा आवाज आल्यानंतर तेथे कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी साळी यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचा चेहऱ्याचा भाग छिन्न विछिन्न अवस्थेत असल्याचे दिसून आले. जितेंद्र साळी यांच्या आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.