PoliticsOfMaharashtra : महाविकास आघाडीवर काँग्रेसनेत्यांची नाराजी काय म्हणून ?

शिवसेनेने भाजपशी फारकत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत समझौता करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सरकारला राज्यात कोरोनाशी लढाई करावी लागत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही निर्णयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना विश्वासात घेत असल्याने काँग्रेसच्या मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सेना -काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सर्व काही आलबेल नाही हे सातत्याने स्पष्ट होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान सत्तेत असतानाही आमचे काही प्रश्न आहेत आणि ते आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कानावर घातले आहेत अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वतः दिली आहे. त्यांचं वक्तव्य हे नाराजीचे स्पष्ट संकेत देणारे आहेत असं म्हटलं जात आहे. सरकारमध्ये असुनही काँग्रेसला विचारात घेतलं जात नाही, म्हणून काँग्रेस नाराज आहे का? असा थेट प्रश्न थोरातांना पत्रकारांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, सहाजिकच आहे आमचेही काही प्रश्न आहेत. अपेक्षा आहेत. त्यावर काम व्हावं असं आम्हाला वाटतं. आमच्या जेव्हा एकत्र बैठका होतात त्यात आम्ही आमच्या भावना व्यक्त करतो असं सांगत त्यांनी नाराजीचा सूर लावला.
विशेष म्हणजे सत्ता स्थापनेपासूनच काँग्रेस नेत्यांमध्ये अशा प्रकारची भावना आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही काँग्रेसने एका जागेवरून ताणून धरलं होतं. नंतर तो प्रश्न सोडविण्यात आल होता. त्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनांही आम्ही सरकारमध्ये असलो तर निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला नाहीत असं म्हटलं होतं. तर त्याही आधी माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांनीही नाराजी बोलून दाखवली होती. राज्यात आम्ही सत्तेत असलो तरी हे काँग्रेसचं नाही तर शिवसेनेचं सरकार आहे असं चव्हाण एका कार्यकर्त्याशी बोलताना म्हणाले होते. या सर्व नेत्यांच्या वक्तव्यामुळेच काँग्रेस महाविकास आघाडीत नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समस्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिसरा वाटेकरी असलेल्या काँग्रेसने प्रथमच आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. गेले दोन दिवस काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठका सुरू असून आज माध्यमांकडे प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या नाराजीला तोंड फोडले. राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे एखादा निर्णय होत असताना त्यात काँग्रेसचे मतही विचारात घेणे आवश्यक आहे. काँग्रेसच्या ज्या काही मागण्या आहेत त्या अर्थातच राज्याच्या हिताच्या असून याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत व आमचं म्हणणं त्यांच्या कानावर घालणार आहोत, असे थोरात यांनी माध्यमांना सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात वारंवार बैठका होत असताना काँग्रेसला मात्र सरकारच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याने काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजी आहे. त्यात गेले दोन दिवस काँग्रेसच्या अंतर्गत बैठकाही सुरू झाल्या आहेत. काल विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या घरी तर आज मंत्री सुनील केदार यांच्या निवासस्थानी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत सरकारमध्ये काँग्रेसचे स्थान नेमके कोणते, या मुद्द्यावर बराच खल झाला. राज्यसभा निवडणूक, विधान परिषद निवडणूक, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या-बदल्या या सगळ्या विषयांवर बैठकीत चर्चा झाली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी थेट माध्यमांकडे आपली नाराजी व्यक्त केल्याने आघाडीत बराच अंतर्गत तणाव असल्याचे उघड झाले आहे.
सरकारने महत्त्वाचे निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घ्यायला हवं
राज्यपाल नियुक्त १२ सदस्य विधान परिषदेवर जाणार असून त्यात काँग्रेसला अधिकच्या जागा दिल्या जाव्या.
राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ देण्याबाबत काँग्रेसचे मत जाणून घ्यावे.