सोनू सूद वरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवरच चालवला बाण…

Flagging off relief material trucks sent by BJP to Konkan for people affected by #NisargaCyclone at BJP Maharashtra office, Mumbai#BJP4Seva https://t.co/siuviUDXjX
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) June 8, 2020
लॉकडाऊनच्या काळात हजारो स्थलांतरितांना मदत करणारा अभिनेता सोनू सूद याचं नाव भारतीय जनता पक्षाशी जोडल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत. ‘चांगलं काम करणारे सगळे भाजपचे असतात असा विश्वास शिवसेनेला आहे याचा आम्हाला आनंदच आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे. निसर्ग चक्रीवादळामुळं बाधित झालेल्या कोकणातील नागरिकांना भाजपच्या वतीनं आज मदतीचे ट्रक पाठवण्यात आले. त्यावेळी फडणवीस यांना राज्यात सध्या गाजत असलेल्या सोनू सूद प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली. राज्यातील ठाकरे सरकार अपयशी असल्याचं दाखवण्यासाठीच सोनू सूद याला महात्मा बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच तो भाजपचा स्टार प्रचारक म्हणून दिसेल, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.
दरम्यान फडणवीस यांनी राऊत यांच्या या वक्तव्याचं स्वागत केलं. ‘सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच आहे. असं असलं तरी सोनू सूद यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर एक चांगलं काम केलं. त्याचं कौतुक झालं पाहिजे. आमचं सरकार राज्यात जलयुक्त शिवारचं काम करत असताना नाम फाऊंडेशन आणि आमीर खानची पाणी फाऊंडेशनही समांतर काम करत होती. पण आम्ही हेवेदावे ठेवले नाहीत. ते एकप्रकारे सरकारला मदत करत होते. त्यामुळं त्यांना मदत कशी करता येईल हेच आम्ही पाहिलं,’ असं फडणवीस म्हणाले. ‘जे मदत करतात त्यांची मदत घेतली पाहिजे. अशा बाबतीत राजकारण करणं पूर्णपणे चुकीचं आहे,’ असंही फडणवीस म्हणाले.