AurangabadNewsUpdate : सर्वेक्षण कर्मचाऱ्यास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन – डॉ. विजयकुमार फड

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या प्रसारास अटकावा करिता सर्वेक्षण अधिकारी/कर्मचाऱ्याची नेमणुक करण्यात आली असून हे कर्मचारी आपल्या आरोग्य तपासणी करिता आपल्या घरोघरी येऊन तपासणी करणार आहेत तेव्हा सर्वेक्षण कर्मचाऱ्यास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर आयुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी आज येथे केले.
सातारा परिसर वार्ड कार्यालयात सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटरबाबत प्रशिक्षण देण्यात आले. अप्पर आयुक्त तथा प्रमुख निरीक्षक डॉ. विजयकुमार फड, वार्ड अधिकारी के. जी. दौड, कार्यकारी अभियंता प्रकाश पवार, आरोग्य अधिकारी सर्वश्री डॉ. पी. ए. कराड, डॉ. अर्चना तातेड, डॉ. डी. पी. परदेशी, डॉ. शोयेब शेख यांनी प्रशिक्षण दिले.
आपल्या आरोग्याची काळजी घेणे आपल्या हातात असून ‘मला कोरोना काही करु शकत नाही’ ही मानसिकता बदलून नागरीकांनी वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर पाळणे, प्रत्येकाने एमएचएमएच (MHMH) माझे आरोग्य माझ्या हाती या ॲपचा वापर करणे, वयोवृद्ध व आजारी व्यक्तीनी अत्यंत आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर न पडणे, कोरोना विषाणुची बाधा होऊ नये या दृष्टीकोनातून घालून दिलेल्या नियामावलीचे पालण करणे. आरोग्याच्या तपासणी करिता येणाऱ्या कोरोना योध्यांना म्हणजेच सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यास सर्वेतोपरी सहकार्य करावयाचे आहे, असे सांगून डॉ. फड म्हणाले की, या सर्वेक्षणा करिता आशा वर्कस, शिक्षक अशा एकूण 400 कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आली असून हे सर्व लोक अत्यंत धाडसाने आणि आत्मीयतेने व सामाजीक भावनेतून काम करत आहे, तेव्हा आपण त्यांना एक जागृक नागरिक म्हणून सहकार्य करणे ही आपली नैतिक जबाबदारीच आहे, तेव्हा नागरिकांनी ताप, घसा खवखवणे आदी लक्षणे असल्यास त्वरीत सर्वेक्षण कर्मचाऱ्यास माहिती द्यावी. आपल्या घरातील आजारी व्यक्तीला लपवून ठेवू नये, यामुळे सर्वांचेच आरोग्य धोक्यात येऊ शकते. तेव्हा नागरिकांनी एक जागृक नागरीकांची भूमिका पार पाडून कोरोना प्रसार प्रतिबंध करण्यास कोरोना योध्यांना सहकार्य करावयाचे असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. फड यांनी डॉक्टर, प्रशिक्षणार्थी यांच्या समस्या जाणून घेतल्या.
प्रशिक्षण कर्त्यांना डॉ. फड यांच्या हस्ते किट चे वाटप करण्यात येऊन ऑक्सीमीटर, थर्मल गन चा वापर कसा करायचा याचे प्रात्याक्षिकासह संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. या सर्वेक्षणात दररोज एका प्रशिक्षणार्थीनी 100 घरामधील 50 वर्षाच्या वरील व्यक्तीची तपासणी करण्यात येणार असून त्यात नागरिकांची थर्मल गनद्वारे शरीरातील तापमान, तसेच ऑक्सीमीटरद्वारे नाडी परिक्षण व शरीरातील ऑक्सीजन पातळीची तपासणी करण्यात येणार आहे.