Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PoliticsOfMaharashtra : विधानपरिषदेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अर्ज दाखल

Spread the love

बऱ्याच चर्चेनंतर  विधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या अर्जासोबत त्यांनी प्रतिज्ञापत्रावर आपल्या संपत्तीचे विवरण सादर केले असून त्यांच्याकडे जवळपास १२५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांचं हे प्रतिज्ञापत्र अद्याप निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आलेलं नाही. या आधी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आधी आदित्य ठाकरे यांनी तर आता विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून आपली संपत्ती जाहीर केली. यानिमित्ताने प्रथमच ठाकरेंच्या संपत्तीचा तपशील लोकांच्या समोर आला आहे.

उद्धव यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचं असं एकही वाहन नाही. त्यांच्या मालकीचे मुंबई दोन बंगले आहेत. वांद्रे कलानगर येथील मातोश्री बंगला तसेच तिथून जवळच साकारलेला नवा बंगला आणि कर्जत येथील फार्महाऊस याचा तपशील त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिला आहे. विविध कंपन्यांचे शेअर्स, कंपन्यांमधील भागिदारी आणि त्यांचे डिव्हिडंड हे उत्पन्नाचे स्रोत असल्याची नोंदही यात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चल आणि अचल अशी जवळपास १२५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. प्रतिज्ञापत्रात दाखल गुन्हे व तक्रारींचाही तपशील देण्यात आला आहे. उद्धव यांच्याविरुद्ध एकूण २३ गुन्हे दाखल होते. त्यापैकी १२ गुन्हे रद्द झालेले आहेत तर अन्य खासगी तक्रारी आहेत. .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज, सोमवारी विधानपरिषद सदस्यत्वासाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळं आता त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. काँग्रेसनं एका जागेवर माघार घेतल्यानंतर विधान परिषदेच्या ९ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे ठाकरे यांच्यासह नऊही उमेदवार बिनविरोध निवडून येतील, असं सांगितलं जात आहे. नव्या समीकरणानुसार, राज्यात विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी भाजपने चार उमेदवार मैदानात उतरवले आहेत. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. तत्पूर्वी, काँग्रेसच्या एका उमेदवारानं माघार घेतली. काँग्रेसनं दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, त्यातील राज किशोर मोदी विधान परिषद निवडणुकीतून माघार घेत असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल सांगितलं. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. याआधी महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसनं शनिवारी विधान परिषदेच्या दोन जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर एका उमेदवारानं माघार घेतल्याची घोषणा थोरात यांनी काल केली. दरम्यान, विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!