#CoronaVirusEffect : भयानक , धक्कादायक , दुःखद : लॉकडाऊनने घेतले १४ बळी , मध्यप्रदेशातील मजूर रेल्वेखाली चिरडून ठार, २ गंभीर जखमी, ३ वाचले ….

देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या भीतीने हातातले काम गेल्यामुळे बेहाल झालेले जालना शहरातील एका स्टील कंपनीमध्ये काम करणारे मजूर गावाकडे निघाले असता काळाने शुक्रवारी भल्या पहाटेच त्यांच्यावर घाला घातला आणि १९ पैकी १४ मजूर करमाड नजीक रेल्वेरुळावर एका मालगाडीखाली येऊन चिरडले गेले . बदनापूर ते करमाडदरम्यान हि दुर्घटना घडली. हे १९ मजूर औरंगाबादहून गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी पायी निघाले होते. जालन्याहून रेल्वे रुळावरून पायी निघालेले हे मजूर रात्री थकल्यानंतर सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरु आहे . लोकांची हातातली कामे गेली आहेत . त्यामुळे बाहेरच्या राज्यातील कामगारांचे मोठे हाल होत आहेत . त्यातूनच जालना येथील एका स्टील कंपनीत काम करणारे मजूर गावाकडे जाण्याच्या ओढीने औरंगाबाद -जालना रस्त्यावर असणारा पोलिसांचा बंदोबस्त चुकवून औरंगाबादकड़े रेल्वे रुळाच्या निघाले होते . सध्या लॉकडाऊनमुळे प्रवासी रेल्वेसेवा बंद असल्याने हे सर्व कामगार बदनापूर ते करमाडच्या दरम्यान सटाणा शिवाराजवळ रात्र झाली म्हणून रेल्वे रुळावरच बसले आणि झोपी गेले. मात्र, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे जाणारी मालगाडी केंव्हा आली त्यांना चिरडून गेली ते त्यांना कळलेच नाही . यात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ५ जण गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.
काल गुरुवारी रेल्वेने मध्यप्रदेशातील मजुरांसाठी औरंगाबादहून भोपाळला एक गाडी गेल्याचे समजल्याने आपल्यालाही औरंगाबादहून गावकडे जात येईल या आशेने हे सर्व मजूर औरंगाबादच्या दिशेने पायी निघाले होते. मात्र मध्येच काळाने त्यांना गाठले आणि या भीषण अपघातात १४ जणांचा करुण अंत झाला. याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.