#AurangabadNewsUpdate : परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः सह इतरांचाही जीव जपावा – विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

औरंगाबाद शहरात कोरोना रूग्ण संख्या नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र रूग्णांची संख्या वाढत आहे. हा संसर्ग वेळीच रोखणे सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे.तरी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः सह इतरांचाही जीव जपावा, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज येथे केले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित कोरोना संसर्ग रोखण्याबाबतच्या बैठकीत श्री.केंद्रेकर बोलत होते. यावेळी ,खा.इम्तियाज जलील, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्यासह कोरोना बाधित क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते,मौलवी, लोकप्रतिनिधी ,संबंधित अधिकारी उपस्थित होते.
खा.जलील यांनी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करत सर्वांच्या संरक्षणासाठी नियमांचे अधिक कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन केले. तसेच लाॅकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था लोकांना जेवण, ईतर मदत करत आहे.त्यादृष्टीने अशा स्वयंसेवी संस्थासाठी माफक दरात धान्य, वस्तूंचा पुरवठा केला तर अनेकांच्या जेवणाची व्यवस्था अधिक जास्त प्रमाणात करता येईल,अशी सूचना केली. औरंगाबाद कोरोनामुक्त करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग, पोलिस, स्वयंसेवी संस्था सर्वतोपरि उपाययोजना करत आहे.त्या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी लाॅकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करणे खुप जास्त गरजेचे बनले आहे.कारण आता कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.हे वेळीच रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे.तरच परिस्थिती हाताबाहेर जाण्या आधी आपण शहराला सुरक्षित करू शकतो.त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचा वापर गरजेचा आहे. त्यासाठी उदयापासून सकाळी 7 ते 11 पर्यंतच नागरिकांना घरा बाहेर पडता येईल. त्यानंतर पूर्णपणे शहर बंद राहील.लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करावे जेणेकरून परिस्थिती नियंत्रणात आणणे शक्य होईल . कोरोना बाधिताच्या संपर्कात आलेल्यां मध्ये संसर्ग वाढतोय .त्यामूळे तो पसरणार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी आपला आणि आपल्या माणसांचा जीव धोक्यात न घालता नियम पाळावे.हा आपत्तीचा काळ आहे. गांभीर्याने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करावे,असे आवाहन करून श्री.केंद्रेकर यांनी या काळात रोज मेडिकल स्टोअर्स चालू राहतील , पण त्यांनी ग्राहक नोंद ठेवणे आवश्यक आहे.दाट वस्तीत, कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे . त्या ठिकाणी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे विभागीय आयुक्त यांनी सांगितले.
रमजान सणाच्या पाश्र्वभूमीवर विशेष खबरदारी घ्यावी.मौलवी , लोकप्रतिनिधींनी नागरिकांना समजून सांगावे.सर्वानी फळ व इतर खाद्य पदार्थ, वस्तूंची खरेदी विक्री सात ते अकराच्या वेळेतच करावी.मास्क वापर आवश्यक असून योग्य पद्धतीने तो सर्वांनी करावा. आरोग्य यंत्रणानी सर्व सुविधा उपलब्ध करून क्वारंटाईन कक्ष सज्ज ठेवावेत.नागरिकांना विश्वासात घेऊन तपासणीसाठी,अलगीकरणासाठी तयार करावे. संचारबंदी शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी पोलिसांनी वाहनांची अधिक कडक तपासणी करावी.
उद्यापासून कडक लाॅकडाऊन
उद्या पासून सकाळी सात ते अकरा नंतर लाॅकडाऊनची अधिक कडक अंमलबजावणी करावी. हाॅटस्पाॅट एरीयात आठवड्यातून दोनदा पाणी द्यावे.अन्नधान्य , औषधे लोकांना तिथेच उपलब्ध करून द्यावी.सर्व सुविधा सुरळीत पणे तिथे कटाक्षाने उपलब्ध करून द्याव्यात. संध्याकाळचा बाजार बंद करण्यात यावा.पोलीसांनी विविध वसाहती अंतर्गत रस्ते, गल्ली येथे गस्त वाढवत परिस्थिती वर नियंत्रण ठेवावे, असे निर्देश संबंधितांना देऊन श्री.केंद्रेकर यांनी या सर्व प्रयत्नासाठी लोकप्रतिनिधी, मौलवी, स्वयंसेवी संस्थांनी नागरीकांना समजून सांगत जनजागृती करावी,असे आवाहन यावेळी संबंधितांना केले.
यावेळी उपस्थितांच्या सूचनांची नोंद घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल , असे जिल्हाधिकारी श्री.चौधरी तसेच पोलिस आयुक्त श्री.प्रसाद यांनी सांगितले.