रमजान महिन्यामध्ये शासनाच्या गाईड लाईनचे पालन करावे- गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन

औरंंंगाबाद : कोरोना विषाणूबाबत काही जण सोशल मिडियाचा वापर करून अफवा पसरवित असल्याचे समोर आले आहे. सोशल मिडियाचा गैरवापर करून अफवा पसरविणा-यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात रविवारी (दि.१९) गृहमंत्री देशमुख यांच्या उपस्थितीत कोरोना विरूध्दच्या लढाईत करण्यात आलेल्या उपाय योजनांचा त्यांनी आढावा घेतला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात लागू करण्यात आलेली संचारबंदी अधिक कडक करण्यात येणार असून त्याबाबतच्या सुचना गृहमंत्र्यांनी पोलिस प्रशासनास दिल्या आहेत. सोशल मिडियाचा वापर करून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणा-यावर कठोर कारवाई करण्याच्या सुचना देखील गृहमंत्र्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. तसेच औरंगाबाद शहरात तबलिगी समाजाचे १०२ लोक वास्तव्यास असून त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या क्वारंटाईनची मुदत संपल्यावर त्यांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तबलिगी समाजाच्या लोकांनी त्यांना मिळालेल्या व्हीसाचा गैरवापर केला असल्याचे चौकशीत समोर आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही गृहमंत्री देशमुख यांनी दिला आहे.
दरम्यान, रमजान महिन्यामध्ये शासनाच्या गाईड लाईनचे पालन करावे असे आवाहन मुस्लिम समाजबांधवांना करण्यात आले आहे. तसेच त्याबाबतच्या सुचना मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंना देण्यात आले असल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले. बाहेरच्या राज्यातील कोणीही महाराष्ट्रात येऊ नये यासाठी राज्याची सीमा सील करण्यात आली असून ती खुली करणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अत्यावश्यक परिस्थितीत अथवा कोणाचा मृत्यू झाला असल्यास त्याच्या अंत्यविधीसाठी जाणाNयांना पोलिस प्रशासनाची व जिल्हा प्रशासनाची परवानगी घेवूनच जिल्हा व राज्याच्या हद्दीबाहेर जाता येईल असे गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत यावेळी रोहयोमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
शेतमाल वाहतूकीस कोणतीही अडचण नाही
शेतक-यांनी उत्पादीत केलेल्या शेतमालाची एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात वाहतूक करण्यास कोणतीही अडचण नाही. शेतक-यांनी उत्पादीत केलेला माल एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात विक्री करीता नेण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी आवश्यक नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.