#CoronaVirusEffect : दुनिया : अमेरिकेत कोरोनाचा थरार , काल दिवसभरात मृत्यूची संख्या २६००च्या घरात….

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला आहे. जगभरात २० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, १ लाख ३४ हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे . कोरोनामुळे सर्वाधिक भीषण परिस्थिती अमेरिका आणि युरोपात आहे. अमेरिकेत २८ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात अमेरिकेतील न्यू जर्सी येथे एक धक्कादायक प्रकार घडला. येथील नर्सिंग होममध्ये तब्बल १७ मृतदेह पोलिसांना आढळले असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. न्यू जर्सी शहरातील पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने नर्सिंग होमच्या बाहेर शेडमध्ये मृतदेह ठेवल्याची माहिती दिली. जेव्हा पोलीस दाखल झाले तेव्हा त्यांना हे तब्बल १७ मृतदेह सापडले. या बातमीनंतर संपूर्ण देश हादरला आहे. तर, पोलीस प्रमुख एरिक सी. डॅनिअलसन यांनी, “लोकांचा मृत्यू होत असल्यामुळे सध्या येथील लोकं भारावून गेली आहेत. हे मृतदेह कोणी ठेवले याचा शोध सुरू आहे”, असे सांगितले. अमेरिकेत करोनाच्या संसर्गामुळे परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. बुधवारी एकाच दिवसात अमेरिकेत २६०० जणांचा मृत्यू झाला आहे. कोणत्याही देशात एकाच दिवसांत नोंदवण्यात आलेली ही सर्वोच्च संख्या आहे. अमेरिकेत मृतांची संख्या ही ३० हजारांहून अधिक झाली असल्याची माहिती जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे.
अमेरिकेत करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे प्रशासन हतबल झाले आहे. याआधी अमेरिकेत एकाच दिवशी २५६९ जणांचा मृत्यू झाला होता. जगातील सर्वाधिक करोनाबाधितांची संख्या अमेरिकेत झाली आहे. अमेरिकेत बुधवारी ३० हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. मंगळवारी २६ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती. न्यूयॉर्क राज्याला सर्वाधिक फटका बसला आहे. न्यूयॉर्कमध्ये दोन लाख १४ हजारांहून अधिक जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ११ हजारजणांना मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कमधील करोनाबाधितांची संख्या ही चीन, इटली, स्पेन, जर्मनी, ब्रिटन आदी युरोपीयन देशांपेक्षा अधिक आहे. न्यूजर्सी राज्यातही करोनाबाधितांची संख्या वाढत असून ७० हजारांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, ३१५६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनासोबत आमची लढाई सुरू असल्याचे म्हटले आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नवीन उपाययोजना आखण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार मृतदेह सापडलेल्या १७ जण ही अंडोवर सबक्युट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर १ आणि २ मधील कर्मचारी असण्याची शक्यता आहे. येथे याआधी ६८ जणांचा मृत्यू झाला होता त्यातील २६ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पण्ण झाले होते. राज्यातील बहुतेक नर्सिंग होममध्ये कोरोनाव्हायरसची किमान एक घटना नोंदवली जात आहे. यात न्यू जर्सीमध्ये बुधवारपर्यंत ६ हजार ८१५ रूग्णांना कोरोनाची लागण झाली. बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ३५१ कोरोनाव्हायरस संबंधित मृत्यूंपैकी कमीतकमी ४५ लोक वृद्ध होते. अमेरिकेत करोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. सध्या ६ लाख ४४ हजारांहून अधिकजणांना करोनाची लागण झाली आहेत. तर २८ हजाराहून अधिक जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. या शिवाय स्पेनमध्ये 1 लाख ८० हजारांहून अधिकजणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर १८ हजार ८१२ जणांचा बळी गेला आहे. त्याचबरोबर इटलीत एक लाख ६५ हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. तर, मृतांचा आकडा २१ हजारांवर गेला आहे. तर, जगभरात आतापर्यंत ५ लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे.