Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : #Covid-19 Effect : देशात २४ तासात ५४९ रुग्ण आणि १७ मृत्यू , ४७३ रुग्णांची झाली सुट्टी….

Spread the love

देशात कोरोनाचा कहर चालूच असून आज केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशभरात ४७३ लोक उपचारानंतर आपल्या घरी गेले असून कोरोनाग्रस्तांची संख्या ५७३४ इतकी झाली असून एकूण मृत्यूंची संख्या १६६ इतकी झाली असल्याची माहिती लव अग्रवाल यांनी दिली आहे. गेल्या २४ तासात ५४९ नवीन रुग्ण आढळून आले असून मृतांची संख्या १७ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अकोला जिल्ह्यात सापडले ७ कोरोनाचे रुग्ण 

करोनाच्या प्रादुर्भावापासून दूर असलेला अकोला जिल्हाही आता करोनाच्या विळख्यात सापडला आहे. अकोल्यात आज एक-दोन नव्हे तर करोनाचे सात रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे अकोल्यातील करोना रुग्णांची संख्या नऊवर गेली आहे. अकोल्यात दोन रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने या रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली होती. त्याचे अहवाल आले आहेत. प्रशासनाने एकूण १४८जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी १०९ जणांचे अहवाल आले असून त्यापैकी एकूण ९ जणांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर १०० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एकूण ९ करोना रुग्णांपैकी सात जणांचे अहवाल आज आले. हे सर्वच्या सर्व नऊजण वाशिममधील एका करोना रुग्णाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना लागण झाल्याचं जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलं. दरम्यान, लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून करोनाबाधितांच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. तसेच अकोल्यातील जिल्हा रुग्णालयांची पाहणी करण्यात आली असून करोनाबाधितांसाठी विशेष वॉर्ड करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला 

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२९७ झाली आहे. कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात १०७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात आज आणखी दोन नवे रुग्ण आढळल्याने पुण्यातील करोना रुग्णांची संख्या २०४ वर गेली आहे. पुणे शहरात १६८, पिंपरी-चिंचवडमध्ये २२ आणि पुणे ग्रामीणमध्ये १४ रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यातील मृतांचा आकडा २०वर गेला आहे. यात ससून रुग्णालयात १२, नोबल रुग्णालयात दोन आणि जिल्हा रुग्णालय, दिनानाथ रुग्णालय, जहांगीर रुग्णालय, सह्याद्री रुग्णालय, नायडू आणि इनामदार रुग्णालयात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

लॉकडाऊनचे दिवस कमी-कमी होत असताना राज्यातील करोना बाधितांचा आकडा मात्र दिवसागणिक वाढत आहे. मागील १२ ते १४ तासांत करोनाग्रस्तांमध्ये १६२ रुग्णांची भर पडली असून ही संख्या आता तेराशेच्या जवळ पोहोचली आहे. पुणे जिल्ह्यातील करोनाबाधित मृतांची संख्या २० वर गेली आहे. यातील एकजण बारामतीतील असून इतर १९जण पुण्याच्या हद्दीतील असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील सर्वाधिक १४३ रुग्ण आहेत.

मास्क घालणे सक्तीचे करण्यात आले असून , मास्क न घालणारांवर कडक कारवाईचे आदेश 

देशात करोनाची साथ आल्यापासून मुंबई हे करोनाच्या संसर्गाचं जणू केंद्रच बनलं आहे. येथील संसर्ग थांबता थांबत नाही. शहरातील अनेक परिसर सील केल्यानंतरही संसर्ग थांबताना दिसत नाहीए. वरळी आणि धारावी हे दोन विभाग मुंबईतील सर्वाधिक बाधित आहेत. तेथील रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी व बाधितांचा आकडा कमी करण्यासाठी प्रशासन शक्य ती सर्व पावलं उचलत आहे. खबरदारी म्हणून महापालिकेनं निर्बंध आणखी कठोर केले असून घराबाहेर पडताना मास्क घालणं सक्तीचं केलं आहे. औरंगाबाद शहरातही मास्क घालणे आता कायद्याने सक्तीचे करण्यात आले असून महापालिकेच्या वतीने लेखी आदेश जारी करण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!